विमानतळावर तस्करीचे सोने पकडले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/gold.jpg)
महिलेकडून ८२ लाखांचे ३ किलो सोने जप्त
पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आखाती देशातून तस्करी करून आणलेले ८२ लाखांचे ३ किलो सोने सीमा शुल्क विभागाने जप्त केले. या कारवाईत एका महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. सोन्याची भुकटी करून प्लास्टिकच्या पिशवीत लपवून ठेवल्याचे तपासणीत उघड झाले आहे.
बेबी शिवाजी वाघ असे तस्करी करणाऱ्या महिलेचे नाव आहे. तिच्या विरोधात भारतीय सीमा शुल्क कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी पहाटे दुबईहून आलेल्या विमानातून वाघ पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. लगबगीत ती विमानतळातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होती. सीमा शुल्क विभागाच्या पथकाची नजर तिच्यावर पडली. तिच्या संशयास्पद हालचाली टिपल्या. तिच्याकडील सामानाची तपासणी करण्यात आली तेव्हा तिने कमरेला बांधलेल्या पट्टय़ात प्लास्टिकच्या चार पिशव्या ठेवल्या होत्या.
पिशव्यांमध्ये सोन्याची भुकटी ठेवल्याचे तपासणीत उघड झाले. तिच्याकडून ३ किलो २८० ग्रॅम वजनाची सोन्याची भुक टी जप्त करण्यात आली. सीमा शुल्क विभागाचे सहआयुक्त के. आर. रामाराव, उपायुक्त हर्षल मोटे, सुधा अय्यर, एस. आर. सोमकुंवर आदींनी ही कारवाई केली.