विधानसभा विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा ?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/images_1542447579775_radhakrishna_vikhe_patil8-1.jpg)
- विरोधीपक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा
- राजीनामा दिलाच नसल्याचा विखे पाटलांचा खुलासा
नवी दिल्ली – सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्याने विखे पाटील परिवाराबद्दल कॉंग्रेसमध्ये नाराजी निर्माण झाली. आताविधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समजते. सुजयचा मुद्दा व्यवस्थित हाताळता आला नसल्याचे काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय यांच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केलीय. दिल्लीत राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे आणि शरद पवारांची बैठक झाली. सुजय विखेंचा प्रश्न योग्यरितीनं न हाताळल्याबद्दल तसंच त्यांच्या भाजप प्रवेशावरून काँग्रेस हायकमांडमध्ये नाराजी आहे. सुजयचा मुद्दा व्यवस्थित न सोडवल्याची पक्षश्रेष्ठींची भावना आहे.
राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवारांची एकत्रित चर्चा झाली. यात महाराष्ट्रातील स्थितीबाबत आणि जागावाटपावर तासभर चर्चा करण्यात आल्याचे समजते. महाराष्ट्रातील आघाडीच्या जागावाटपाचं चित्र लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
सुजय विखे-पाटलांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटलांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी नगर लोकसभा निवडणुकीत मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने प्रचार करणार नाही आणि मुलगा सुजय विखे पाटील याचाही प्रचार करणार नाही, अशी घोषणा राधाकृष्ण विखे-पाटलांनी केली होती. तरी त्यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, यासाठी पक्षातून दबाव होता. अखेर त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे. परंतु, विखे पाटील यांनी आपण पदाचा राजीनामा दिला नसल्याचा खुलासा केला आहे.