विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी आज मतदान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/election.jpg)
मुंबई – स्थानिक स्वराज्य संस्थांमधून राज्य विधानपरिषदेवर निवडून द्यायच्या 6 जागांसाठी आज निवडणूक होत आहे. ही निवडणूक रायगड- रत्नागिरी- सिंधुदुर्ग, नाशिक, उस्मानाबाद- लातूर- बीड, परभणी-हिंगोली, अमरावती आणि चंद्रपूर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांमध्ये होणार आहे. तर गुरुवारी (दि. 24 मे) रोजी मतमोजणी होणार आहे.
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला शेकापने पाठिंबा दिला असून शिवसेना स्वबळावर लढणार आहे. येथे राष्ट्रवादीकडून सुनिल तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे, तर शिवसेनेतर्फे राजीव साबळे निवडणूक लढवत आहेत. लातूर-बीड- उस्मानाबाद विधानपरिषदेची लढत भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. येथे कॉंग्रेस आणि शिवसेना यांची भूमिका महत्वाची आहे. नाशिक मतदारसंघात राष्ट्रवादीने अॅड. शिवाजी सहाणे, तर शिवसेनेने नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचे परवेझ कोकणी यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने येथे तिरंगी लढत होणार आहे.