वाहनाच्या धडकेत मॉर्निंग वॉक करणा-या तीन महिलांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/accident1.jpg)
अहमदनगर : अहमदनगर – कल्याण महामार्गावर मॉर्निंग वॉक करायला गेलेल्या तीन महिलांचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. जुन्नर तालुक्यातील उदयपूर जवळ ही घटना आज पहाटे साडे पाचच्या सुमारास घडली. मीराबाई ढमाले, कमलाबाई ढमाले आणि सगुणाबाई गायकर अशी अपघातात मृत पावलेल्या महिलांची नावे आहेत.
या विषयी अधिक माहिती अशी की, मयत मीराबाई, कमलाबाई आणि सगुणाबाई या पहाटेच्या वेळी नेहमी मॉर्निंग वॉक करायला जायच्या. आज देखील नेहमीप्रमाणे त्या अहमदनगर-कल्याण या महामार्गावर मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेल्या होत्या. रस्त्याच्या कडेला चालत असताना भरधाव वेगात असणा-या चारचाकी अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली, यामध्ये तिघींचा जागीच मृत्यू झाला.
घटनेचा अधिक तपास ओतूर पोलीस करत आहेत. दरम्यान, अपघातात जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले यांच्या आईचा समावेश असल्याने गावावर शोककळा पसरली आहे. तर अन्य दोन मृत महिलाही त्यांच्याच कुटुंबातील असल्याची माहिती आहे.