breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

वाहनांमध्ये कचऱ्यासाठी पिशवी ठेवणे बंधनकारक?

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचा प्रस्ताव मंजुरीसाठी सरकारदरबारी

मुंबई : वाहनांमधून कचरा भिरकावणाऱ्या आणि पानाची पिचकारी मारणाऱ्या चालक आणि प्रवाशांना वेसण घालण्यासाठी मुंबईतील नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे. सिक्किमप्रमाणेच मुंबईतही वाहनांमध्ये कचरा टाकण्यासाठी पिशव्या ठेवणे बंधनकारक करावे, अशी एकमुखी मागणी नगरसेवकांनी केली आहे.

पालिका सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आलेला हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असून सरकारने मंजुरी दिल्यानंतर वाहनांमध्ये कचऱ्यासाठी पिशवी ठेवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’ अभियानाची साद घातल्यानंतर पालिकेने मुंबईमध्ये स्वच्छता मोहीम हाती घेतली. ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण व्हावे, कचरा निर्माण होतो त्याच ठिकाणी त्याची विल्हेवाट लागावी यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. मोठय़ा गृहसंकुलांना कचऱ्यापासून खतनिर्मिती बंधनकारक करण्यात आली. पालिका कर्मचारीही स्वच्छतेविषयी आग्रही राहावेत, यासाठी कार्यालय स्वच्छता मोहीमही हाती घेण्यात आली. या उपाययोजनांमुळे कचराभूमीत जाणाऱ्या कचऱ्यामध्ये घट झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र भरधाव वाहनांमधून कचरा फेकणे, वाहन सिग्नलला उभे असताना थुंकणे असे प्रकार मोठय़ा प्रमाणात घडत आहेत. त्याकडे पालिकेचे लक्षच नाही. शिवसेना नगरसेविका सुजाता पाटेकर यांनी याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

सिक्किममध्ये स्वच्छता राखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. काही कडक नियमही करण्यात आले आहेत. तिथे प्रत्येक वाहनामध्ये कचऱ्यासाठी पिशवी ठेवणे बंधनकारक आहेत. पिशवी न ठेवणाऱ्या वाहनमालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येते. त्यामुळे सिक्किममध्ये वाहनांतून कचरा फेकण्याच्या प्रकारांना आळा बसला आहे. त्याच धर्तीवर मुंबईतही प्रत्येक वाहनात कचरा टाकण्यासाठी पिशवी ठेवणे बंधनकारक करावे, अशी मागणी करणारी ठरावाची सूचना सुजाता पाटेकर यांनी पालिका सभागृहात सादर केली होती. ती पालिका सभागृहाने एकमताने मंजूर केली. पुढील कारवाईसाठी ही ठरावाची सूचना पालिका आयुक्तांकडे सादर करण्यात आली आहे. प्रशासनामार्फत ती राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. सरकारने मंजुरी दिल्यानंतर वाहनांमध्ये कचऱ्यासाठी पिशवी ठेवणे बंधनकारक करण्यात येईल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button