breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘लोकपाल आंदोलनाचा भाजपने राजकीय लाभ घेवून अण्णांनाच विसरली!’

अहमदनगर – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी युपीए सरकारच्या काळात केलेल्या लोकपाल आंदोलनाचा भारतीय जनता पक्षाने राजकीय लाभ घेतला. मात्र आज सत्तेत आल्यानंतर भाजपला अण्णांचाच विसर पडल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

विखे पाटील यांनी आज राळेगण सिद्धी येथे जाऊन उपोषणावर असलेल्या अण्णा हजारेंची भेट घेतली. प्रकृती खालावत असल्याने अण्णांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती त्यांनी या भेटीमध्ये केली. या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी जाहीर केले. मागील 5 दिवसांपासून अण्णा हजारे उपोषणाला बसले असताना या आंदोलनाबाबत भाजप-शिवसेना सरकारच्या उदासीन धोरणावर त्यांनी संताप देखील व्यक्त केला. याप्रसंगी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विनायकराव देशमुख, पारनेर पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे पाटील आदी उपस्थित होते.

या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना विरोधी पक्षनेत्यांनी भाजप-शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, लोकपाल आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा भारतीय जनता पक्षाने राजकीय लाभ उपटला. लोकपाल कायद्याचे त्यांनी राजकीय भांडवल केले. परंतु, 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर त्यांनी मागील पाच वर्षात त्यांनी लोकपालाची नियुक्ती केली नाही. सरकार कोणत्याही विषयांत गंभीर नाही. पाच वर्षांपूर्वी दिलेल्या प्रत्येक शब्दाचा भाजपला आता विसर पडला असून, त्यांच्या प्रत्येक निर्णयातून जनतेमध्ये विश्वासघाताची भावना निर्माण होत असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

अण्णा हजारेंच्या आंदोलनाला तोंडदेखला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, शिवसेनेला अण्णांची एवढीच काळजी असेल तर त्यांनी आताच्या आता सरकारबाहेर पडायला हवे. अन्यथा लोकांचा शिवसेनेच्या भूमिकेवर विश्वास बसणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button