breaking-newsमहाराष्ट्र

लासलगाव जळीतकांड : पीडित महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी

नाशिक | महाईन्यूज

लासलगाव जळीतकांडातील पीडित महिलेची मृत्युशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. मुंबईतील मसीना बर्न रुग्णालयात उपचार घेत असताना रात्री साडेबाराच्या सुमारास महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने जाहीर केली. गेल्या सहा दिवसांपासून महिला मृत्यूशी झुंज देत होती. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह 3 जणांना अटक केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बसस्थानकावर एका महिलेला पेटवण्यात आल्याची घटना 15 फेब्रुवारी रोजी घडली. प्रेमसंबंधातील वादातून या 30 वर्षीय महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची माहिती समोर आली. या घटनेत ही महिला 67 टक्के भाजली. लग्नाला नकार दिल्यानं पीडित महिलेनं स्वतःला जाळून घेतल्याचा दावा आरोपीने केला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपीला येवला येथून अटक करण्यात आली होती.

याप्रकरणी मुख्य आरोपी रामेश्वर भागवत, पेट्रोल पंप व्यवस्थापक आणि पंप कर्मचारी आकाश शिंदे या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील मुख्य आरोपी रामेश्वर उर्फ बाला मधुकर भागवतला निफाड न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर पेट्रोल पंप कर्मचारी आकाश शिंदे याला 15 हजार रुपयांचा दंड ठोठावून जामिनावर सोडण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतलं होतं. 

काय आहे प्रकरण ? 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या पहिल्या पतीचं निधन झालं आहे. तिने शेजारीच राहणाऱ्या रामेश्वर मधुकर भागवत याच्याशी दोन महिन्यापूर्वीच निमगाव वाकडा येथील रेणुका माता मंदिरात विवाह केला होता. मात्र, रामेश्वर याचा साखरपुडा नातेसंबंधातीलच मुलीशी झाल्यानं, या दोघांमध्ये वाद सुरू होता. दुपारी 5.30 च्या सुमारास ही महिला आपल्या एका सहकाऱ्यासोबत बसस्थानकात उभी होती.

याचवेळी, तेथे रामेश्वर आला आणि त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यातून जवळ असलेले बाटलीतील पेट्रोल दोघांनी आपल्या अंगावर शिंपडून घेत स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. यात महिला 67 टक्के भाजली होती. घटनेनंतर बसस्थानकावर उभ्या असलेल्या प्रवाशांसह एसटी कर्मचाऱ्यांनी धाव घेत आग विझवली. त्यानंतर या महिलेला तातडीने लासलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी गेल्या आठवड्यात शनिवारी मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात मुंबईला हलवण्यात आले होते. मात्र, या महिलेचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि नाशिक दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीडितेची भेट घेतली. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button