लष्कर भागात मद्यपींच्या भांडणात एकाचा खून
![Four members of the same family killed in Gondia](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/murder-451752.jpg)
पुणे : लष्कर भागातील साचापीर स्ट्रीट परिसरात झालेल्या मद्यपींच्या भांडणात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली.
रफिक इस्माईल शेख (रा. रामटेकडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी दीपक अभिमान महाजन (रा. चाळीसगाव) याला लष्कर पोलिसांकडून अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर भागातील बुट्टी स्ट्रीट परिसरात देशी दारूचे दुकान आहे. गुरुवारी रात्री देशी दारूच्या दुकानातील बाकावर बसण्यावरून शेख आणि महाजन यांच्यात वाद सुरू झाला. वादाचे पर्यवसन मारामारीत झाले.
महाजन याने शेखला मारहाण केली. त्यानंतर शेख तेथून पळाला. साचापीर स्ट्रीट परिसरात शेख आला. महाजन त्याचा पाठलाग करून तेथे पोहोचला. त्या वेळी शेखचा नातेवाईक आदिल शेख त्याला भेटला.
महाजनने शेखला पुन्हा मारहाण सुरू केली. मारहाणीत शेख गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तो मरण पावला. पसार झालेल्या महाजनला पोलिसांनी ताब्यात घेतले, असे लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले यांनी सांगितले. दरम्यान, शहरात गेल्या सहा दिवसांत वेगवेगळ्या कारणांवरून आठ जणांचे खून झाले आहेत.