breaking-newsपुणेमहाराष्ट्र

रिक्षाचालकांनाही ‘हेल्मेटसक्ती’!

पुणे वाहतूक पोलिसांची किमया..

पुणे : हेल्मेट न घातल्याबद्दल रिक्षाचालकांकडूनही दंड वसूल करण्याची किमया पुणे वाहतूक पोलिसांनी करून दाखवली आहे! पुण्यात हेल्मेटसक्ती न पाळणाऱ्यांकडून मोठी दंडवसूली सुरू असल्याचे दाखवण्यासाठीच वाहतूक नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांवर ‘हेल्मेटनियम तोडल्याचा’ ठपका ठेवत दंडवसूली सुरू असल्याची चर्चा त्यामुळे जोर धरत आहे.

शहरात १ जानेवारीपासून दुचाकीचालकांना हेल्मेटसक्ती लागू झाली असून, कारवाई तीव्र करण्यात आली आहे. त्याला शहरातून विरोध होत असतानाच वाहतूक पोलिसांचा हा कारभार पुढे आला आहे. हेल्मेट घातले नाही म्हणून रिक्षाचालकांना दंडआकारणीच्या पावत्या काही दिवसांपूर्वी पाठवल्या आहेत. याबाबत रिक्षा चालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत शिवनेरी रिक्षा संघटनेकडून वाहतूक पोलीस प्रमुखांची भेट घेण्यात येणार आहे.

शहरात हेल्मेटसक्ती असली, तरी त्यापूर्वीपासूनच दुचाकी चालकाकडून हेल्मेट न घातल्याच्या दंडाची वसुली करण्यात येत आहे. सध्या ही कारवाई तीव्र करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील हेल्मेट सक्ती विरोधी कृती समिती सक्रिय झाली असून, त्यांच्याकडून पोलिसांच्या भूमिकेला तीव्र विरोध करण्यात येत आहे. या सर्व बाबी घडत असतानाच रिक्षा चालकांना होणाऱ्या दंडाचा विषय शिवनेरी रिक्षा संघटनेने मांडला आहे.

वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहन चालकांना ई-चलानद्वारेही दंडाची आकारणी केली जाते. वाहतूक पोलिसांच्या अ‍ॅपवरही हे चलान उपलब्ध होते. त्याचप्रमाणे वाहन चालकाच्या पत्त्यावर ते पाठविले जाते. संबंधित पावतीत वाहन क्रमांक, नियम तोडल्याचा दिवस आणि वेळ त्याचप्रमाणे कोणता नियम तोडला, याचा तपशील दिलेला असतो. अशाच प्रकारचा तपशील असलेल्या पावत्या काही रिक्षा चालकांना मागील काही दिवसांत मिळाल्या असून, त्यावर कोणता नियम तोडल्याच्या रकान्यात ‘विदाऊट हेल्मेट’ असा स्पष्ट उल्लेख आहे. एमएच १२ जेएस २५०५, एमएच १२ जेएस ४३८८ या क्रमांकाच्या रिक्षा चालकांना अलीकडच्या काळात हेल्मेट दंडाच्या पावत्या पाठविण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष अशोक साळेकर यांनी सांगितले.

रिक्षा चालकांना हेल्मेटच्या दंडाच्या पावत्या आल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. वाहतूक विभागाने कारवाई करताना नियमांचे पालन करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास होऊ नये, याची दक्षता घेतली पाहिजे. याबाबत संघटनेच्या वतीने वाहतूक विभागाच्या प्रमुखांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येणार आहे.

 अशोक साळेकर, शिवनेरी रिक्षा संघटना अध्यक्ष

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button