राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीत सर्व जाती, अल्पसंख्याकांना प्राधान्य
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/jayant-patil.jpg)
असंतुष्टांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९१ जणांच्या नव्या जम्बो कार्यकारिणीत सर्व जातीपाती आणि अल्पसंख्याक समाजाला प्राधान्य देण्यात आले आहे. पक्षात असंतुष्ट असलेल्यांना पद देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची नियुक्ती झाल्यावर तब्बल तीन महिन्यांनी नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
सर्व नेत्यांशी चर्चा करून कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्याचे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राज्यातील सर्व विभाग आणि समाजघटकांना प्रतिनिधित्व देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. भाजपच्या धर्तीवर राष्ट्रवादीनेही बूथ पातळीवर पक्ष संघटना अधिक भक्कम करण्यावर भर देण्यात आला आहे. बूथ पातळीवर काम करून संघटना अधिक मजबूत करण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
कार्यकारिणीत काही अपवाद वगळता पक्षाचे माजी मंत्री, आमदार यांना स्थान देण्यात आलेले नाही.
अल्पसंख्याक समाज राष्ट्रवादीला साथ देत नाही, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. हे लक्षात घेता अल्पसंख्याक समाजातील १५ जणांना संधी देण्यात आली आहे.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना पक्षात मिळणाऱ्या महत्त्वामुळे बीडच्या राजकारणात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे नाराज आहेत.
क्षीरसागर यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
रणजितसिंह मोहिते-पाटील आणि संजीव नाईक या पक्षात नाराज असलेल्या तरुण नेत्यांकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मराठा, इतर मागासवर्गीय, धनगर, माळी, कुणबी, तेली आदी सर्व समाजांना संधी देण्यात आली आहे.
उपाध्यक्षपदी प्रमोद हिंदुराव, जयप्रकाश दांडेगावकर, धर्मरावबाबा आत्राम, संदीप बजोरिया, डॉ. संतोष कोरपे, कृष्णकांत कुदळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नजीब मुल्ला, नईम खान, मुनाफ हकीम, अविनाश आदिक, सुरेखा ठाकरे, बापू भुजबळ, नसिम सिद्दिकी, शेखर निकम आदींची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. चिटणीसपदी संदीप वैद्य, व्हिक्टर डान्टस, संजय बोरगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.