breaking-newsमहाराष्ट्र

रामानंतर उद्धव ठाकरेंची विठ्ठलाकडे धाव, चंद्रभागेच्या तीरावर करणार आरती

अयोध्येतील राम मंदिराच्या निमित्ताने भाजपा विरोधात आक्रमक झालेली शिवसेना आता आणखी आक्रमक झाली आहे. २४ डिसेंबर रोजी शिवसेना पंढरपुरात जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे अयोध्येतील शरयूप्रमाणेच चंद्रभागेच्या तीरावर आरती करणार आहेत. तसेच पंढरपुरात विठुरायाचे दर्शन घेऊन दुष्काळाबाबत सरकारने विविध उपायोजना करावी आणि अयोध्येत राममंदिर बांधण्याची सुबुध्दी सरकारला द्या, असे साकडे घालणार आहेत. यावेळी मुंबई ते पंढरपूर दरम्यान धावणाऱ्या ‘विठाई’ या नव्या एसटी सेवेचा शुभारंभ ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

या सभेसाठी शिवसैनिकांसह राज्यभरातील वारकरी येणार असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक वारकरी संघटनांनी स्वत:हून सभेला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे. राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. संघटना आणि पक्ष म्हणून आपण दुष्काळग्रस्तांना मदत करतच आहोत. तरीही आपण दुष्काळप्रश्नी सरकारला जागे केले पाहिजे, असे ठाकरे यांनी बैठकीत सांगितल्याचे कळते. दरम्यान बैठकीत मंत्र्यांवर सभा यशस्वी करण्यासाठी विविध प्रकारची जबाबदारी सोपविण्यात आली.

या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी शिवसेना भवनात उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना मंत्री आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत सभेच्या तयारीविषयी चर्चा करण्यात आली. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले,  राज्यात सध्या दुष्काळाची भीषण स्थिती आहे. दिवसेंदिवस दुष्काळा आक्राळ-विक्राळ रुप धारण करेल. शिवसेना एकमेव असा पक्ष आहे. जो आपल्या संपूर्ण ताकदीने दुष्काळग्रस्तांच्या मागे उभा राहिला आहे. राम मंदिराबाबतही त्यांनी भाष्य केले. मी अयोध्येला जाऊन आलो म्हणजे राम मंदिराचा विषय सोडून दिला असे नाही. झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करायला हवे, असे म्हणत त्यांनी भाजपाला ठणकावले. राम मंदिराचा विषय हा कायदा करुनच सोडवावा लागणार आहे. राम मंदिर झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, २४ डिसेंबर रोजी पंढरपुरात जाहीर सभा घेऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याचे त्यांनी जाहीर केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button