‘राममंदिर बांधायचे वचन भाजपाचे, काँग्रेसवर खापर फोडू नका’
राममंदिरावरुन शिवसेनेने भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्येत गेल्यामुळे पंतप्रधान मोदींनी राममंदिराचा आपल्या प्रचारसभेत उच्चार तरी केला. नाहीतर भाजपाला रामाचा विसर पडला होता. पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येत राममंदिर बांधायचे आहे, पण काँग्रेस पक्ष न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करीत आहे. काँग्रेसच्या या आडकाठीमुळेच राममंदिराच्या खटल्याला विलंब होत आहे, असा आरोप केला आहे. मोदी यांनी गांधी परिवार, काँग्रेसवर आरोप करणे आता थांबवायला हवे. असे अडथळे व अडचणींचा पाढा वाचण्यासाठी तुम्हाला सत्ता सोपवलेली नाही. राममंदिरास काँग्रेसचा, उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचा अडथळा होता, म्हणून तर लोकांनी त्यांना सत्तेतून बेदखल केले. त्यामुळे आता काँग्रेसवर खापर फोडणे थांबवा. राममंदिर बांधायचे वचन काँगेसने नव्हे तर भाजपाने दिले होते, अशा शब्दांत सेनेने ठणकावले आहे.
छप्पन इंचवाल्या मोदींच्या हाती कारभाराच्या किल्ल्या सोपवल्या. तरीही त्यांना जळी, स्थळी, काष्ठी, काँग्रेस दिसत असेल तर तुमच्या छातीचे मोजमाप जनतेला पुन्हा घ्यावे लागेल. रामाने तुमचे मनोरथ सफल केले. त्या बदल्यात राम अखंड वनवासी राहणार असेल तर राजकीय नौटंकी बंद करा, असे शिवसेनेने ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून सुनावले.
काय म्हटलंय शिवसेनेने…
* मोदी यांना मंदिर उभारण्यासाठी काँग्रेसचा अडथळा वाटतो. काँग्रेसचा अडथळा असतानाही नोटाबंदीची बाबरी उभारली. काँग्रेसचा अडथळा असतानाही जम्मू-कश्मिरात मेहबुबा मुफ्तीबरोबर सरकार स्थापन केले होतेच ना? अनेक वेळा काँग्रेसला फोडून व झोपवून अडथळे दूर केले. मग राममंदिराचा अडथळा काय आहे? मंदिर सरकारनेच बांधायचे आहे व कायद्याच्या चौकटीत राहून बांधायचे असे भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात सांगितले आहे. त्या चौकटीत राममंदिर कधी बसवणार? तिहेरी तलाकसारखे विषय त्या चौकटीतून बाहेर पडले. मग मंदिर का अडकले? एक कायदाच राममंदिरासाठी बनवायचा आहे.
* राममंदिराची निर्मिती ही तुम्हाला कडू जहाल विषासारखी वाटत असेल, पण हे हलाहल पचवावेच लागेल. राममंदिरप्रश्नी काँग्रेस अडथळे आणत असेल तर एक सर्वपक्षीय बैठक बोलावून सरकार अध्यादेश काढून काम सुरू करीत असल्याची वर्क ऑर्डर काढून टाका.
* मंदिरप्रश्नी जो आडमुठी भूमिका घेईल तो राजकारणातून कायमचा संपेल. राहुल गांधींना याची जाणीव आहे. राममंदिरप्रश्नी सगळ्यात मोठा अडथळा काँग्रेसचा वगैरे नसून राजकीय इच्छाशक्तीचा आहे. राहुल गांधींचे अस्तित्व ते किती? काँग्रेसचा जीवदेखील तोळामांसा. मग त्यांना इतके महत्त्व का देता? राममंदिराची घोषणा करा. काँग्रेस पाचोळ्यासारखी उडून जाईल, मात्र काँग्रेसच्या खांद्यावर मंदिराची बंदूक ठेवून राजकारण केलेत तर तुम्हीच उडून जाल. एकवचनी श्रीरामासही हे माहीत आहे. अयोध्येचा राजकीय आखाडा होऊ नये.