राज्याला उन्हाळ्याची चाहूल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/Untitled-6-32.jpg)
कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय वाढ
राज्यात सर्वच ठिकाणी कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय वाढ होत असल्याने थंडीचे दिवस सरून आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. काही ठिकाणी आता रात्रीची थंडीही गायब होत असून, दुपारी उन्हाच्या झळा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात कोकण विभाग वगळता सर्वच ठिकाणी कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत ४ ते ६ अंश सेल्सिअसने वाढला आहे. दरम्यान, विदर्भ, मराठवाडय़ात पावसाची शक्यता कायम आहे.
गेल्या आठवडय़ामध्ये उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह वाढल्याने त्याचप्रमाणे निरभ्र आकाशाच्या स्थितीमुळे अल्पकाळ काहीशी थंडी अवतरली होती. मात्र, सध्या वाऱ्यांची स्थिती बदलली असून, बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ात पावसाची शक्यता व्यक्त होत आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी बुधवारी अवकाळी पाऊस कोसळला. २१ फेब्रुवारीलाही मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
कोकण विभागातील मुंबईतही कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत वाढला असून, तेथे ३० अंश कमाल तापमान नोंदविले गेले सांताक्रूझ, रत्नागिरीमध्येही कमाल तापमान ३० अंशांपुढे आहे. मराठवाडय़ात औरंगाबाद येथे ३५.५, तर बीडमध्ये राज्यातील उच्चांकी ३९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
विदर्भामध्ये जवळपास सर्वच ठिकाणी किमान तापमान ३५ ते ३६ अंशांच्या आसपास आहे. नागपूर येथे ३५.२ कमाल तापमान नोंदविले गेले. अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, यवतमाळ येथील कमाल तापमानाचा पारा ३६ अंशांपुढे गेला आहे.
तापभान..
राज्यात सध्या सर्वच ठिकाणी किमान तापमानात वाढ होऊन थंडी गायब होत आहे. दुसरीकडे कमाल तापमानाच्या पाऱ्यात लक्षणीय वाढ नोंदविली जात आहे. त्यामुळे उकाडा जाणविण्यास सुरुवात झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील पुण्यात बुधवारी ३७.५ कमाल तापमानाची नोंद झाली. सोलापूर, मालेगाव, नाशिक या भागात ३६ ते ३७ अंश कमाल तापमान नोंदविले गेले.