राज्यात इथेनॉल उत्पादन वाढविण्यासाठी 5 कंपन्या
- नितीन गडकरी
- इथेनॉल आणि इलेक्ट्रिक वाहने वाढावीत
पुणे – पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. पुढील काळात इथेनॉल आणि इलेक्ट्रिकसारख्या पर्यायी इंधनाकडे वळावे लागणार आहे. इथेनॉलचे उत्पादन वाढविण्यासाठी महाराष्ट्रात 5 कंपन्या स्थापन करणार असल्याचे केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
इथेनॉल आणि इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणारी वाहने यांचा वापर वाढणे आवश्यक आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमध्ये इथेनॉलची निर्मिती केल्यास आणि त्यावर पश्चिम महाराष्ट्रातील वाहने चालल्यास पर्यावरणालाही फायदा होणार आहे. 100 टक्के इथेनॉलवरही वाहने चालू शकतात. सद्यस्थितीत ऊसापासून इथेनॉल तयार करण्यात येते. मात्र, त्याचबरोबर इतर मार्गातूनही इथेनॉलची उत्पादन करणे आवश्यक असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
राज्यात इथेनॉलचे उत्पादन वाढविण्यासाठी तसेच ऊसाबरोबरच अन्य मार्गातूनही इथेनॉल तयार करण्यासाठी महाराष्ट्रात पाच कंपन्या सुरू करणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. इलेक्ट्रिक बसेससुध्दा काही महानगरपालिकांनी घेतल्या आहेत. पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत इथेनॉल आणि इलेक्ट्रिकवर चालणारी वाहने परवडतात. हायब्रिड इंजिनची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे पेट्रोलबरोबरच 100 टक्के इथेनॉलवरही वाहने चालतील. हायब्रीड इंजिनवरील वाहने येत्या सहा महिन्यांत बाजारात दाखल होतील. या वाहनांमुळे दरमहा तीन ते पाच हजार रुपयांपर्यंतची बचत होईल, असेही गडकरी यांनी सांगितले.