राजकीय वादातून सात वर्षांच्या चिमुरडीची हत्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/diya-jailkar.jpg)
रायगड : जिल्ह्यातील माणगाव येथे सात वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून राजकीय वादातून ही हत्या झाल्याचा संशय आहे. चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दिया जाईलकर या सात वर्षांच्या मुलीचा मृतदेह अखेर सापडला असून तिची हत्या केल्याचे समोर आले आहे.
दिया जाईलकर ही मुलगी २५ मेला संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास दुकानातून काही वस्तू आणायला घराबाहेर पडली होती. मात्र बराच वेळ झाला तरी दिया घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात दिया बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल करण्यात आली. दरम्यान, सोमवारी संध्यााकाळी साडे सातच्या सुमारास दियाचा मृतदेह गावातीलच बंद घरात सापडला. वावे गावातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दियाची आई नुतन जाईलकर या बिनविरोध निवडून आल्या होत्या. या निवडणुकीच्या रागातूनच दियाची हत्या केल्याचा संशय आहे. दरम्यान, दियाच्या हत्येच्या निषेधार्थ आज माणगाव परिसरातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मारेकऱ्याला तातडीने अटक करुन, त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.