रत्नागिरीत भाजप हद्दपार तर शिवसेनेचे पाच उमेदवार
![As many as 27 BJP corporators in 'Ya' Municipal Corporation on the way to Shiv Sena?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/Bmc-shivsena-vs-bjp_.jpg)
रत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यासह अन्य काही जिल्ह्यातील उमेदवारांना AB फॉर्म दिले आहेत. रत्नागिरीतील पाचही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार जाहीर झाले असले, तरी भाजपचा मात्र या ठिकाणी एकही उमेदवाराने फॉर्म भरलेला नाही. त्यामुळे रत्नागिरीतून भाजप हद्दपार झाल्याची एकच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दापोलीतून योगेश कदम, चिपळूणमधून सदानंद चव्हाण, गुहागरमधून भास्कर जाधव, राजापूरमधून राजन साळवी, रत्नागिरीतून उदय सामंत असे पाच उमेदवार आहेत. भाजपकडून गुहागर मतदारसंघात डॉ. विनय नातू यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र, याबाबतची कोणतीही घोषणा न झाल्याने रत्नागिरीत भाजप हद्दपार झाल्यात जमा आहे.
रत्नागिरी जिल्हा हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 1985 च्या विधानसभा निवडणुकीत दापोलीतून चंद्रकांत मोकल, खेडमधून तु.बा.कदम, चिपळूणमधून निशिकांत जोशी, संगमेश्वरमधून मुसा मोडक, रत्नागिरीतून शिवाजी जड्यार, राजापूरमधून लक्ष्मण हातणकर हे काँग्रेसचे, तर गुहागरमधून श्रीधर नातू हे एकमेव भाजपाचे आमदार निवडून आले होते.