‘यूपीएससी-प्री’चा पेपर टफ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/Exam-69.jpg)
- उपस्थितीही घटली
- उशिरा आलेल्यांना “नो एंट्री’
पुणे- केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात “यूपीएससी’ची पूर्व परीक्षा रविवारी शहरात सुरुळीत पार पडली. या परीक्षेसाठी दोन तास अगोदर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर शहरातील काही केंद्रावर एक-दोन मिनिट उशिरा पोहचल्याने, त्या उमेदवारांना परीक्षेपासून वंचित राहावे लागल्याचे दिसून आले. सुमारे 60 टक्के उमेदवारांनी परीक्षा दिली असून, यंदा अनुपस्थितांची संख्या तुलनेने अधिक होती. दरम्यान, पेपर “टफ’ होता, असे काही उमेदवारांनी म्हटले आहे.
यूपीएससी पूर्व परीक्षा मागील परीक्षेच्या तुलनेत “टफ’ होती. सकाळी जनरल स्टडीज, तर दुपारी सी-सॅटचा पेपर प्रत्येकी 200 गुणांचा होता. वेळेबाबत यापूर्वीच सूचना मिळाल्याने बहुतांश उमेदवार वेळेत उपस्थित होते. मात्र, अनुपस्थित उमेदवारांचे प्रमाण यंदा जास्त होते. मात्र परीक्षा “टफ’ गेल्याने मेरिट लिस्टही खाली येण्याची शक्यता आहे.
– परमेश्वर राठोड, यूपीएससी परीक्षार्थी.
युपीएससी पूर्व परीक्षा सकाळी एक पेपर व दुपारी एक पेपर असे दोन सत्रात झाली. सकाळी 9.30 ते 11.30 आणि दुपारी 2.30 ते 430 अशी परीक्षेची वेळ होती. या परीक्षेसाठी 30 हजार 400 उमेदवारांनी नोंदणी केली होती. ही परीक्षा पुण्यातील 74 उपकेंद्रावर झाली. सकाळच्या सत्रात 18 हजार 58 उमेदवारांनी परीक्षा दिली, तर 12 हजार 372 उमेदवार उपस्थित नव्हते. दुपारच्या सत्रात 18 हजार 301 उमेदवारांनी परीक्षा दिली, तर 12 हजार 129 उमेदवार गैरहजर होते. या परीक्षेसाठी प्रत्येक केंद्रावर 5 पोलीस कॉन्स्टेबल तपासणीसाठी नेमण्यात आले होते. प्रत्येक उमेदवारांची तपासणी करूनच परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात होता.
दरम्यान, शहरातील एक केंद्रावर एका विद्यार्थिनीला परीक्षा केंद्रात पोहचण्यास दोन मिनिट उशिरा झाला. मात्र सकाळी 9 वाजून 20 मिनिट असतानाच प्रवेशद्वार बंद करण्यात आले. या विद्यार्थिनीला प्रवेश उशिरा आल्याने दिला गेला नाही. मात्र बहुतांश उमेदवारांनी वेळेत पोहचले. परंतु सकाळी झालेली परीक्षा काही उमेदवारांना अवघड गेले. त्यामुळे काही उमदेवारांनी दुपारी होणाऱ्या परीक्षेसाठी पाठ फिरविल्याचे दिसून आले. जिल्हा प्रशासनने परीक्षेची योग्य पद्धतीने नियोजन केल्याचे दिसून आले.