मोबाइल चोराला पकडताना ट्रेनखाली येऊन मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/mumbai-train.jpg)
मोबाइल चोराचा पाठलाग करताना ट्रेनच्या खाली येऊन एका ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मुंबईतील चर्नीरोड स्टेशनवर रविवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली. शकील शेख असे मृत व्यक्तीचे नाव असून ते गोरेगाव येथे राहतात. चर्चगेटला जाणारी स्लो लोकल सकाळी ६.४५ च्या सुमारास चर्नीरोड स्थानकात आली. शकील शेख आपल्या सहकाऱ्यांसमवेत त्यावेळी ट्रेनमध्ये उभे होते.
एक अज्ञात व्यक्ती सेकंड क्लासच्या डब्यात शिरला. शेख किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना काही कळण्याआधीच त्याने शकील यांच्या हातातील मोबाइल हिसकावून पळ काढला. शेख यांनी लगेच त्या चोराला पकडण्यासाठी धावत्या लोकलमधून उडी मारली व त्याचा पाठलाग सुरु केला. त्या दरम्यान त्यांचा पाय प्लॅटफॉर्मवरुन घसरला व त्याच लोकलखाली येऊन शकील शेख यांचा दुर्देवी मृत्यू झाला.
शकील शेख मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नोकरी करायचे. शेख यांना पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. चोराने दिवसाढवळया डब्यात घुसून इतक्या साऱ्या प्रवाशांसमोर फोन चोरल्याबद्दल प्रीतेश त्रिपाठी यांनी आश्चर्य व्यक्त केले. ते शकील शेख यांचे नातेवाईक आहेत. स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजवरुन तीन संशयितांची ओळख पटवण्यात आली आहे. रेल्वे पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे.