मोबाइल चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा खून
![Four members of the same family killed in Gondia](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/murder-451752.jpg)
पुणे : रस्त्यात झोपलेल्या एकाच्या खिशातील मोबाइल संच चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरटय़ाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आल्याची घटना बाह्य़वळण मार्गावर घडली.
चंद्रकांत बहाद्दूर थापा (वय २८, मूळ रा. नेपाळ) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी रवी लिंबा राठोड याला अटक करण्यात आली आहे. पोलीस हवालदार दत्तात्रय ठोंबरे यांनी या संदर्भात सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-बंगळुरु बाह्य़वळण मार्गावर वडगाव पुलाजवळ एका दुकानाच्या परिसरात एक जण बेशुद्धावस्थेत पडल्याचे नागरिकांनी मंगळवारी सकाळी पाहिले. त्याला पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, पोलिसांनी मृतावस्थेत सापडलेल्या व्यक्तीची ओळख पटवली. चंद्रकांत थापा एका उपाहारगृहात स्वयंपाकी म्हणून काम करत होता अशी माहिती पोलिसांना मिळाली. मंगळवारी पहाटे थापा बाह्य़वळण मार्गावरून जात होता. राठोड रस्त्याच्या कडेला झोपला होता. त्याच्या खिशातील मोबाइल संच चोरण्याचा प्रयत्न थापाने केला.
झोपेतून जागे झालेल्या राठोडने थापाला विरोध केला. त्यांच्यात झटापट झाली. झटापटीत राठोडने थापाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तेव्हा राठोडने थापाला मारहाण केल्याची कबुली दिली. राठोड गवंडी काम करतो. त्याची गवंडी काम करणाऱ्या सहकाऱ्यांबरोबर भांडणे झाल्यानंतर तो रात्री न सांगता बाहेर पडला होता. रस्त्याच्या कडेला तो झोपला होता. त्या वेळी थापाने त्याच्या खिशातील मोबाइल संच चोरण्याचा प्रयत्न केला, असे सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी सांगितले.