breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

‘मोनो’तून स्कोमीला डच्चू?

दुसऱ्या टप्प्याच्या विलंबामुळे कारवाईची शक्यता; वडाळा ते सातरस्ता सेवा नव्या वर्षांत

वडाळा ते संत गाडगे महाराज चौक (सातरस्ता) अशी दुसऱ्या टप्प्यातील मोनो सेवा कार्यान्वित करण्यास होणाऱ्या विलंबामुळे मोनो रेल्वे प्रकल्पामधून ‘स्कोमी’ला पायउतार करविण्याच्या तयारीत ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ (एमएमआरडीए) आहे. तर दुसऱ्या टप्प्याकरिता आवश्यक असणाऱ्या मोनो वाहकांची भरती आणि प्रशिक्षण प्रक्रि येची सुरुवात स्कोमीने केल्याचे समजते.

दुसऱ्या टप्प्याकरिता आवश्यक असलेल्या मोनो गाडय़ा आणण्यास होणाऱ्या विलंबाचे कारण देत ‘एमएमआरडीए’ स्कोमीवर कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.  भारतातील पहिल्या मोनो प्रकल्पाचा चेंबूर ते वडाळा हा पहिला टप्पा लोकांच्या सेवेत आहे. मात्र वडाळा ते सातरस्ता या दुसऱ्या टप्प्याकरिता आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या मिळवूनही या मार्गिकेवरील सेवा अजूनही ‘एमएमआरडीए’ला कार्यान्वित करता आलेली नाही. मोनोचे व्यवस्थापन पाहणाऱ्या ‘स्कोमी’ने या मार्गासाठी आवश्यक असणाऱ्या मोनो गाडय़ा न आणल्याने ही सेवा खंडित आहे. सध्या प्रशासनाकडे १० मोनो गाडय़ा असून त्यापैकी सहा गाडय़ा पहिल्या टप्प्यात चालविल्या जातात. दुसऱ्या टप्प्यातील  सेवा सुरू करण्यासाठी प्रशासनाला आणखी पाच गाडय़ांची आवश्यकता आहे. या गाडय़ा जानेवारी महिन्यापर्यंत सेवेत दाखल करण्याची सूचना ‘एमएमआरडीए’ने ‘स्कोमी’ला केली आहे. मात्र नव्या गाडय़ा दाखल करण्यासंदर्भात त्यांच्याकडून कोणत्याच हालचाली सुरू नसल्याने त्यांना प्रकल्पामधून बाहेर काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती ‘एमएमआरडीए’मधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. शिवाय गाडय़ा न आणल्यास त्यांची बँकेमध्ये असलेली हमीरक्कम जप्त केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

‘स्कोमी’ने मात्र नवीन कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू केल्याचे समजते.  मोनो वाहक  आणि तांत्रिक बाबीसाठी आवश्यक असणारे तीन महिन्यांचे प्रशिक्षण सात ते आठ प्रशिक्षणार्थी घेत असल्याचे सूत्राने सांगितले.

मात्र ‘मुंबई मेट्रो संचालन महामंडळा’च्या स्थापनेच्या पाश्र्वभूमीवर ‘एमएमआरडीए’ हे महत्त्वाचे पाऊल  उचलण्याचे धाडस दाखवीत आहे. या स्वायत्त संस्थेच्या बळावर येत्या कालावधीत सुरू होणाऱ्या मेट्रो प्रकल्पांचे संचालन आणि व्यवस्थापन खासगी कंत्राटदारांना न देण्याच्या निर्णय प्राधिकरणाचा आहे. त्यामुळे मोनो प्रकल्पालादेखील या स्वायत्त संस्थेच्या बळावर चालविण्याच्या तयारी प्राधिकरणाने दाखवली आहे.

येत्या नव्या वर्षांच्या सुरुवातीच्या कालावधीत मोनो प्रकल्पाचा वडाळा ते सातरस्ता हा दुसरा टप्पा कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासाठी स्कोमीचा तांत्रिक पाठिंबा असल्याचा किंवा नसल्याचा विचार केला जाणार नाही.

– आर. ए. राजीव, महानगर आयुक्त, एमएमआरडीए

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button