breaking-newsमहाराष्ट्र

मृत मासे खाल्ल्याने मगरीचा मृत्यू

प्रदूषित पाण्यामुळे कृष्णा नदीतील मृत मासे खाल्ल्याने एका पाच वर्षांच्या मगरीचा मृत्यू झाला असल्याचे उघडकीस आले. मृत मगरीचे मिरजेतील कृष्णा घाटाजवळच शुक्रवारी रात्री दहन करण्यात आले.  गेल्या चार दिवसांत कृष्णा नदीत मासे मरून किनाऱ्यावर वाहून येण्याचे प्रकार घडत असून या प्रदूषणामागील नेमके कारण काय आहे, हे निष्पन्न करण्यात प्रदूषण नियंत्रण विभागाला अद्याप यश आलेले नाही.

पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने नदीतील पाण्याची पातळी वेगाने वाढली. या दरम्यान, नदीपात्रातील मृत माशांचा खच किनारी दिसू लागला. मोठय़ा प्रमाणात मासे आणि खेकडे या जलचर प्राण्याचे मृतावशेष किनारी लागत आहेत. पलूस तालुक्यातील धनगावपासून अगदी कोल्हापूर जिल्ह्य़ातील नृसिंहवाडीपर्यंत मृत मासे किनारी लागत आहेत.

या दरम्यान, शुक्रवारी मिरजेतील कृष्णा घाट परिसरातील बोंद्रे मळा येथे मृतावस्थेत मगर आढळून आली. या मगरीची लांबी १२ फूट असून तिच्या जबडय़ात दहा ते बारा मासेही आढळून आले आहेत. मृत मगरीची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल मनोज कोळी, वनपाल पावशे, वनरक्षक आर.एस. पाटील, पांडुरंग वाघमारे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण जाधव, अ‍ॅनिमल राहतचे किरण नाईक, सचिन साळुंखे, चेतन छाजेड, सूरज शिंदे, विजय भोसले, अशोक लकडे आदींनी ही मृत मगर ताब्यात घेऊन तपासणी केली.

मगरीच्या मृतदेहावर घातपात केल्याचे लक्षण आढळून आलेले नाही. तिच्या अंगावर अथवा जबडय़ावर कोणत्याही खुणा आढळलेल्या नाहीत. मात्र मगरीच्या आजूबाजूला मृत मासे मोठय़ा प्रमाणात आढळून आले. यामुळे दूषित पाण्यामुळे मेलेले मासे पोटात गेल्याने झालेल्या विषबाधेमुळेच या मगरीचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला आहे. रात्री उशिरा मळा भागात मगरीच्या शवाचे दहन करण्यात आले.

दरम्यान, याच पद्धतीने पलूस तालुक्यातील धनगाव ते औदुंबर दरम्यान, आणि नृसिंहवाडी येथे दोन मगरींचा मृत्यू झाल्याचे प्राणिमित्र अशोक लकडे यांनी सांगितले. मगरीचे होत असलेले मृत्यू हे नसíगक नसून यामागे चोरटी वाळू वाहतूक आणि मातीउपसा करणारी टोळी असावी, अशी शंकाही त्यांनी वर्तवली. विषबाधा करून मारलेले एखादे जनावर मगरीच्या अधिवासात टाकून त्याद्वारे मगरींची हत्या घडवून आणली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. मोठ्या मगरींची हत्या उघडकीस येउ शकते, मात्र  लहान मगरींचे हत्याकांड चोरून सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button