मुलीने प्रियकराच्या मदतीने वडिलांचे १४ लाख हडपले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/23arrested_54_18.jpg)
कराड : जन्मदात्या पित्याने अवघं आयुष्य हमाली करून, दुसऱ्याची ओझी वाहून जमविलेले १४ लाख रुपये मुलीनेच प्रियकराच्या मदतीने गिळंकृत केल्याची धक्कादायक घटना म्हसवड येथे समोर आली आहे. याप्रकरणी वंदना ढगे व तिचा प्रियकर राजकुमार शिवदुलारे या दोघांनाही म्हसवड पोलिसांनी अटक केली असून, त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की विठ्ठल बाळू ढगे (५७, रा. म्हसवड) हे हमाली व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांची पत्नी नर्मदा यांना पक्षाघात झाला आहे. त्यांचा मुलगा नितीन हा कामानिमित्त त्यांच्या कुटुंबासह म्हसवडच्या शिक्षक कॉलनीत राहतो. त्यांची एक मुलगी विवाहित तर दुसरी मुलगी वंदना ही शिक्षणासाठी पुणे येथे असते. फिर्यादी ढगे हे हमाली करून आपला उदरनिर्वाह चालवून वंदनाला दरमहा शिक्षणासाठी दहा हजार रूपये पाठवत होते. दोन वर्षांपूर्वी आठ दिवस कॉलेजला सुटी असल्याचा बहाणा करून वंदना म्हसवडला आली. त्यावेळी फिर्यादी ढगे हे बाहेरगावी गेले होते. या संधीचा फायदा घेऊन वंदना हिने भोळा स्वभाव असलेल्या आईस दुसऱ्या बँकेत ज्यादा व्याज मिळेल यासाठी एसबीआय बँकेतील पैसे दुसऱ्या बँकेत टाकू असे सांगून आईला रिक्षातून बँकेत नेऊन तेथील अधिकाऱ्यांना माझी आई आजारी आहे. तिला मोठय़ा दवाखान्यात न्यायचे असून, आम्हाला पैशाची गरज असल्याचे सांगून आईच्या खात्यामध्ये असलेले ४ लाख ९३ हजार ५०० रूपयाची रक्कम दि. २३ मे २०१६ रोजी काढून घेतली. नंतर घरी येऊन घरातील साडेतीन तोळे सोन्याचे दागिने तसेच म्हसवड येथील एसबीआय बँकेच्या दुसऱ्या खात्याचे एटीएम व पिन नंबर घेऊन ती पुण्याला निघून गेली. हा प्रकार वडिलांच्या लक्षात आला. याच कालावधीत पुणे येथे जाऊन वंदनाने विविध एटीएममधून ८ लाख १९ हजार रुपये काढले. वंदना आणि तिच्या प्रियकराने संगनमताने फिर्यादी विठ्ठल ढगे यांच्या खात्यातून ८ लाख १९ हजार, तर आई नर्मदा हिच्या खात्यातून ४ लाख ९३ हजार ५०० व सुमारे ५५ हजार रूपयांचे दागिने असा एकूण १३ लाख ६७ हजार ५०० रूपये हडप केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.