मुख्यमंत्र्यांच्या नावाने चिठ्ठी लिहून अडत व्यापाऱ्याची आत्महत्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/fashi.jpg)
उस्मानाबाद : सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे दरात सातत्याने घसरण होत आहे. हमीभाव, कर्जमाफी, फुकट बियाणे, शेततळे अशा घोषणांमुळे तर शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यातीलच आपण एक आहोत, असं म्हणत अडत व्यापाऱ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील शुक्रवारची ही घटना आहे. दत्तात्रय गुंड असे या 32 वर्षीय व्यापाऱ्याचे नाव आहे. तरुण अडत व्यापार्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्यावर्षी सहा हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केलेला 800 क्विंटल हरभरा पडून असल्याचंही दत्तात्रय गुंड यांनी म्हटले आहे.
दत्तात्रय गुंड यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप केले आहेत. ”सर्व व्यापारी आणि शेतकरी तुम्हाला चोर दिसतात. म्हणून तर त्या दोघांत भांडणे लावून आपण पाहत बसला आहात. आतापर्यंत व्यापार्यांनीच तारल्यामुळे शेतकरी जिवंत होता. नुकतेच जीवन चालू झाले होते. तुमच्या सरकारी धोरणाने आणि दुष्काळाने ते संपवले आहे. आपल्या धोरणामुळे हा शेतकरी कायमचा संपावर जात आहे. आणखी कितीजण याच वाटेने जाणार, याची वाट पाहू नका. निर्णयात बदल करुन शेतकरी आणि व्यापारी दोन्ही जगवा,” असे गुंड यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.