मुंबईत उंच इमारतींच्या छतावर स्टंटबाजी करणाऱ्या परदेशी तरुणांना अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/hQmloFU6.jpg)
मुंबईतील प्रभादेवी भागातील उंच इमारतींच्या छतावर एका इमारतीवरुन दुसऱ्या इमारतीवर उडी घेणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओवरुन पोलिसांनी संबंधीत तरुणांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे ही परदेशी मुलं असल्याचे समोर आले आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, मुंबईतल्या प्रभादेवी भागातील एलफिन्स्टन रोड इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील तेरा मजल्याच्या इमारतीच्या छतावर काही तरुण एका इमारतीवरुन दुसऱ्या इमारतीवर उड्या घेत स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. जीवावर उदार होऊन काळजाचा ठोका चुकवणाऱ्या स्टंटबाजीचा हा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेत संबंधीत तरुणांना शोधून काढले आणि त्यांना ताब्यात घेतले.
दादरमध्ये राहणाऱ्या तरुणांचा हा ग्रुप असून दादर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. काही लोकांनी या तरुणांच्या स्टंटबाजीचे चित्रीकरण केले. मात्र, त्या मुलांना जीवघेणी स्टंटबाजी करताना कोणीही अडवले नाही. त्यामुळे पोलीस चित्रीकरण करणाऱ्यांचाही शोध घेऊन त्यांच्यावरही कारवाई करणार आहेत.