breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मुंबईकरांचा स्वस्तातला ‘बेस्ट’ प्रवास सुरू

प्रतिसाद उत्तम, मात्र पहिल्याच दिवशी उत्पन्नात ५० टक्क्यांनी घट

प्रवासी आणि उत्पन्नवाढीसाठी बेस्ट प्रशासनाने मंगळवारपासून लागू केलेल्या भाडेकपातीचे पाहिले उद्दिष्ट प्रवाशांनी स्वस्त बेस्ट प्रवासाला जोरदार पसंती दिल्याने साध्य झाले. मात्र तुलनेत उत्पन्नात वाढ न झाल्याने बेस्टला आर्थिकदृष्टय़ा तग धरण्याकरिता कसरत करावी लागणार आहे. पहिल्या दिवशीचे प्रवास आणि उत्पन्नाचे आकडे उपलब्ध झाले नसले तरी अनेक वाहकांकडे जमा होणारे उत्पन्न जवळपास ५० टक्क्यांनी घसरले होते.

बेस्टच्या स्वस्त प्रवासाला मुंबईकरांनी चांगली पसंती दिली. ठिकठिकाणी बस स्थानकांवर नेहमीपेक्षा गर्दी होती. मात्र उपलब्ध बसगाडय़ांचा ताफा, वेळेवर न येणाऱ्या बसगाडय़ा यामुळे रांगेत प्रवाशांना बराच वेळ ताटकळावे लागले. भाडेकपातीमुळे बेस्टचे उत्पन्न कमी होण्याची भीती आहे. कुर्ला ते हुतात्मा चौकपर्यंत सकाळच्या सत्रात धावणाऱ्या एका बसफेरीचे (जाणाऱ्या)उत्पन्न हे सोमवापर्यंत १,४०० रुपये  होते. आता हेच उत्पन्न ६०० रुपयांपर्यंत आले आहे. हेच चित्र ठिकठिकाणी होते.

परिवहन विभागाने भाडेकपातीच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने बेस्ट उपक्रमाने मंगळवारपासून नवीन भाडेदर लागू केले. आता साध्या बसचे पाच किलोमीटरसाठी किमान भाडे पाच रुपये, तर वातानुकूलितचे सहा रुपये भाडे झाले आहे. १५ किलोमीटरपुढील साध्या प्रवासासाठीही सरसकट २० रुपये भाडे आकारले जाणार आहे.

याआधी किमान भाडय़ासाठी आठ रुपये आकारले जात होते. तेव्हा प्रवासी जरी कमी असले तरी उत्पन्न मिळत होते. आता भाडे कमी केल्याने प्रवासी वाढले तरी उत्पन्न कमी होणार आहे. त्यावर भाडय़ाच्या गाडय़ांचा ताफा वाढवून उत्पन्न वाढविण्याचा बेस्टचा विचार आहे. म्हणजे सहा महिन्यांत बेस्ट बसगाडय़ांचा ताफा वाढल्यास प्रवासी संख्याही ४० ते ५० लाखांपर्यंत वाढेल. परंतु, बेस्टच्या आर्थिक गाडे रुळावर येण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल.

बेस्टच्या दरकपातीमुळे रिक्षा-टॅक्सी चालकांचे खासकरून शेअर गाडय़ा चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट स्थानकाबाहेरही असणाऱ्या शेअर टॅक्सीचालकांना या दरकपातीचा फटका बसला. फक्त वाढते प्रवासी टिकवण्यासाठी बेस्टला भविष्यात बसगाडय़ांचा ताफा आणि वेळेचे गणित पाळण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.

बेस्ट सध्या उपलब्ध बसगाडय़ांमध्येच ही सेवा देत आहे. त्यामुळे प्रवासी संख्या वाढल्यास बेस्ट समोर मोठा पेच निर्माण होईल. आणखी ताफा वाढवण्यासाठी बेस्टकडे सध्या गाडय़ा नाहीत. येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत भाडेतत्त्वावरील ४०० मिनी बसगाडय़ा व त्यानंतर साध्या व वातानुकूलित बसगाडय़ांचा ताफा वाढवण्यात येणार आहे. तोपर्यंत उपलब्ध बसगाडय़ांमध्येच सेवा देण्यात येणार आहे.

उद्घोषणेद्वारे माहिती..

बेस्ट प्रवाशांना स्वस्त प्रवास झाल्याची माहिती काही ठिकाणी उद्घोषणेद्वारेही दिली जात होती. यासाठी मेगाफोनचा वापर केला जात होता. मुंबई सेंट्रल व महालक्ष्मीसह अन्य काही स्थानकांबाहेर बेस्टचे तिकीट तपासनीस ‘पाच रुपयांत करा स्वस्त प्रवास’अशी उद्घोषणा करताना दिसत होते. त्यामुळे प्रवासी बेस्टच्या बसस्थानकाकडे वळत होते.

बेस्टबसगाडय़ांची संख्या : ३ हजार ३३७

दररोज होणाऱ्या फेऱ्या : ४७ हजार ८८८

दररोजची प्रवासी संख्या : २४ लाख

चालक-वाहक : २० हजारापर्यंत

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button