मित्रमैत्रिणींना सेल्फी पाठवून आरे कॉलनीत दोन मुलींची आत्महत्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/water-death-1-1.jpg)
मुंबईतील गोरेगावमधील आरे कॉलनीत दोन अल्पवयीन मुलींनी विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही मुली या १७ वर्षांच्या असून त्या शाळेत शिकत होत्या. प्रेमभंगामुळे या दोघींनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
अनिता पाड्यात राहणाऱ्या १७ वर्षांच्या दोन मुली या चांगल्या मैत्रिणी आहेत. या दोघींनी मंगळवारी संध्याकाळी विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी दोघींनी मोबाईलवर सेल्फी काढला आणि तो मित्रमैत्रिणींना पाठवला. यातील एकीने विहिरीलगत काढलेला सेल्फी भावालाही पाठवला होता. ‘आम्ही आत्महत्या करत आहोत’, असा मेसेजही त्यांनी फोटो पाठवताना केला होता, असे समजते. हा प्रकार समजताच स्थानिकांनी त्यांना बाहेर काढले. दोघींना तातडीने सिद्घार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोघींचाही तोवर मृत्यू झाला होता. याबाबत अद्याप कोणताही दुजोरा मिळू शकलेला नाही. दोघींचा नुकताच प्रेमभंग झाला होता, यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असे सूत्रांनी सांगितले.