मालेगाव बॉम्बस्फोट खटला : गहाळ पुराव्यांच्या नक्कल प्रतींची सत्यता कशी पडताळणार?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/malegaon-blast-1.jpg)
उच्च न्यायालयाने एनआयएकडून स्पष्टीकरण मागितले
मुंबई : २००८च्या मालेगाव स्फोटाशी संबंधित खटल्यात सादर करण्यात आलेल्या गहाळ पुराव्यांच्या नक्कल प्रती (झेरॉक्स) या खऱ्या पुराव्यांच्याच आहेत याची सत्यता विशेष न्यायालय वा राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कशी पडताळणार, असा सवाल उच्च न्यायालयाने सोमवारी उपस्थित केला. तसेच त्याबाबत खुलासा करण्याचे आदेश एनआयएला दिले.
काही साक्षीदारांचे जबाब आणि आरोपींच्या कबुलीजबाबाच्या प्रती गहाळ झाल्याची तसेच त्याबाबतच्या नक्कल प्रती पुरावा म्हणून न्यायालयात सादर करण्यास एनआयएला परवानगी देण्याच्या विशेष न्यायालयाच्या आदेशाला आरोपी समीर कुलकर्णी याने आव्हान दिले आहे. सादर करण्यात आलेल्या नक्कल प्रती या खऱ्या पुराव्यांच्याच हे कसे सिद्ध करणार, असा सवालही कुलकर्णी याने याचिकेत उपस्थित केला आहे.
सोमवारी झालेल्या सुनावणीत सादर करण्यात आलेल्या नक्कल प्रती या खऱ्या पुराव्यांच्याच आहेत? विशेष न्यायालय वा एनआयए त्याची पडताळणी कशी करणार, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. त्याचप्रमाणे त्याबाबत बुधवारच्या सुनावणीत खुलासा करण्याचे आदेश एनआयएला दिले.
जानेवारी २०१७ मध्ये काही साक्षीदारांचे जबाब आणि आरोपींचे कबुलीजबाब गहाळ झाल्याचे उघडकीस आल्यावर एनआयएने त्याच्या नक्कल प्रती न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्याची विनंती विशेष न्यायालयाकडे केली होती.