महिला शिपायाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; मुंबई-माझगाव येथील प्रकार
मुंबई : माझगाव येथील एका शाळेतील ५८वर्षीय महिला शिपायाने चार वर्षांच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी सोमवारी शाळेत जाऊन तक्रार केली, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. यानंतर शाळेने संबंधित महिला शिपायाला निलंबित केले, तर भायखळा पोलिसांनी तिला अटक केली आहे.
आठवड्याभरापासून पीडित मुलगी पोटात दुखते म्हणून शाळेत जाण्यास टाळाटाळ करत होती. यासंदर्भात तिच्या पालकांनी तिला विचारले असता, तिने शिपाई महिलेने स्वच्छतागृहात नेले व आपल्या खासगी भागांना स्पर्श केल्याचे सांगितले. यानंतर त्या मुलीच्या पालकांनी स्त्रीरोगतज्ज्ञांकडून तिची तपासणी केली असता डॉक्टरांनी तिच्या खासगी भागांना इजा झाली असून, संसर्ग झाल्याचे सांगितले. यानंतर पालकांनी तातडीने शाळेत धाव घेतली आणि मुख्याध्यापकांशी संपर्क साधला. मुलीने केलेल्या तक्रारीवरून शाळा प्रशासनाने संबंधित शिपाई महिलेला निलंबित केले. या प्रकरणी पालकांनी भायखळा पोलिस ठाण्यात तक्रार केली असून शाळा प्रशासन पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही मुख्याध्यापकांनी सांगितले. दरम्यान, भायखळा पोलिसांनी संबंधित शिपाई महिलेला अटक केली असून तिची चौकशी सुरू आहे.
पालकांमध्ये भीती…
हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक पालकांनी सोमवारी आपल्या मुलांना शाळेत न पाठविणे पसंत केले. दरम्यान, या प्रकरणी सर्व पालक, शिक्षक यांची सभा घेऊन त्यांचा गैरसमज दूर करण्यात येत असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. इतक्या जुन्या शाळेत प्रथमच असा प्रकार घडला असून, यापुढे तो घडणार नाही यासाठी चोख बंदोबस्त करण्यात येणार असल्याचे शाळा प्रशासनाने मान्य केल्याचे एका पालकाने सांगितले.