breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

महिनाभरात २२ लाख मोबाइल तिकीटविक्री

उपनगरी प्रवासासाठी प्रवाशांचा ‘स्मार्ट’ वापर; मध्य रेल्वेवर विक्रमी विक्री

मोबाइल तिकीट सेवेला मध्य व पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मार्चमध्ये मध्य रेल्वेवर मोबाइलद्वारे १३ लाख ७९ हजार ६७७ तर पश्चिम रेल्वेवर आठ लाख ८८ हजार ६२९ तिकिटांची विक्री झाली. मध्य रेल्वेवरील विक्री विक्रमी असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

तिकीट खिडक्यांसमोरील रांगा कमी व्हाव्यात यासाठी रेल्वे मंत्रालयाने तिकीट खिडक्यांबरोबरच मोबइल अ‍ॅपवरही तिकीट काढण्याचा पर्याय प्रवाशांसमोर ठेवला. दोन वर्षांपूर्वी मोबाइल तिकीट सुविधा सुरू करण्यात आली. त्याला प्रवाशांकडून फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. मोबाइलमधून केवळ काहीशे तिकिटांची विक्री होत होती. हा प्रतिसाद वाढावा यासाठी मध्य व पश्चिम रेल्वेने जनजागृती मोहीम हाती घेतली होती. तिकीट खिडकीवर, तसेच काही स्थानकांत स्टॉल उभारून प्रवाशांना मोबाइल तिकीट सेवेची माहिती देण्यात येत होती. त्यामुळे हळूहळू या अ‍ॅपला मिळणारा प्रतिसाद वाढला.

एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या काळात मध्य व पश्चिम रेल्वेवरील मोबाइल तिकीट सेवेला उत्तम प्रतिसाद मिळू लागला. तिकिटांची मोठय़ा संख्येने विक्री होऊ लागली. यात पश्चिम रेल्वेपेक्षा मध्य रेल्वेवर मोबाइल तिकीट विक्रीला प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. एप्रिल २०१८ मध्ये मध्य रेल्वेवर तीन लाख ६५ हजार ७२९ इतकी तिकीट विक्री झाली. तर पश्चिम रेल्वेवर दोन लाख ५५ हजार २२५ तिकिटे विकली गेली. मोबाइल तिकिटांना प्रतिसाद वाढतच असून मार्च २०१९ मध्ये त्यात लक्षणीय वाढ झाली. मार्च २०१९ मध्ये १३ लाख ७९ हजार ६७७ मोबाइल तिकिटांची विक्री झाली. पश्चिम रेल्वेवर त्याच महिन्यात आठ लाख ८८ हजार ६२९ तिकिटे मोबाइल अ‍ॅपद्वारे विकली गेल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मध्य रेल्वेवर ५८.७४ टक्के वाढ

गेल्या वर्षभरातील मोबाइल तिकिटांची विक्री पाहता मध्य रेल्वेवर दररोज सरासरी २८ हजार ६९१ तिकिटांची आणि पश्चिम रेल्वेवर १८ हजार ७५ तिकिटांची विक्री झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या तुलनेत मध्य रेल्वेच्या मोबाइल तिकीट विक्रीत ५८.७४ टक्के वाढ झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button