breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

महाराष्ट्राची भाषिक फाळणी परवडणारी नाही!

मराठीप्रेमी पालक महासंमेलनात लक्ष्मीकांत देशमुख यांचे प्रतिपादन

एका बाजूला श्रीमंत इंग्रजी महाराष्ट्र आणि दुसऱ्या बाजूला गरीब मराठी महाराष्ट्र अशी महाराष्ट्राची भाषिक फाळणी आपल्याला परवडणारी नाही. त्यामुळे मराठी शाळांचे सक्षमीकरण आणि इंग्रजी शाळांचे मराठीकरण झाले पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.

गोरेगाव येथील महाराष्ट्र विद्यालयात ८ व ९ डिसेंबर रोजी ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. या महासंमेलनाचा एक भाग म्हणून अ. भि. गोरेगावकर शाळा ते महाराष्ट्र विद्यालय दरम्यान ‘मराठी शाळा जागर यात्रा’ काढण्यात आली होती. मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व पालकांना पटवून देणे आणि राज्यभरातील प्रयोगशील मराठी शाळांना एका मंचावर आणणे हा यामागील उद्देश आहे.

विद्यार्थीसंख्या कमी असलेल्या मराठी शाळा सरकार बंद करते, मात्र विद्यर्थी का कमी झाले हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. आजार काय झाला हे न पाहाताच भयंकर औषध देऊन रोगीच कसा मरेल याची व्यवस्था करायची, अशी टीका देशमुख यांनी केली. महाराष्ट्रात मराठी शाळांसाठी काम करावे लागणे हे अनैसर्गिक आहे. राजकीय वर्गासाठी मराठी शाळा हा मतांचा मुद्दा नाही, म्हणून त्या दुर्लक्षित राहतात, अशी खंत मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार यांनी व्यक्त केली. ज्यांच्या घरातील पहिली पिढी शिक्षणात उतरते, त्यांना निकोप शैक्षणिक वातावरण उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही काम करतो. पालकांनो, फक्त गर्दीतील चेहरा बनू नका. आमच्या चळवळीत सहभागी व्हा, अशी साद त्यांनी पालकांना घातली. वडील प्रशासकीय अधिकारी आणि आई मानसशास्त्रज्ञ असतानाही मराठी शाळेतून शिकलेल्या अभिनेत्री चिन्मयी सुमितही संमेलनाला उपस्थित होत्या. आपली मुले मराठी शाळेत शिकून आज कशी यशस्वी झाली याचा दाखला त्यांनी दिला.

फलटणच्या शिक्षिका संजोत उंडे आणि शिरुरचे शिक्षक गंगाधर तोडमल यांनी आपल्या शाळेत राबवलेल्या शैक्षणिक प्रयोगांबाबत माहिती दिली. संजोत यांनी मराठी आणि इतिहासाच्या पुस्तकातील धडय़ांतील प्रत्येक प्रसंगाचे चित्र रेखाटण्यास मुलांना सांगितले. त्यामुळे एकदा शिकवलेली माहिती विद्यार्थ्यांच्या कायम लक्षात राहाते. तसेच त्या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया वर्गात प्रत्यक्ष राबवतात. यात मुले स्वत: निवडणुकीला उभी राहतात, प्रचार करतात, मतदान करुन आपले नेतृत्त्व निवडतात. यातून त्यांना लोकशाही राज्यपद्धत कळते. गंगाधर यांच्या शाळेत गटपद्धतीने शिक्षण दिले जाते, जेणेकरुन विद्यर्थ्यांकडे व्यक्तिश: लक्ष देता येते. तज्ज्ञ व्यक्तिंच्या मार्गदर्शनाखाली ‘हस्ताक्षर सुधारणा प्रकल्प’ राबविण्यात येतो.

दहावीचा निकाल चांगला लागावा यासाठी काही शाळा विद्यार्थ्यांना नववीतच नापास करतात. अशांसाठी ‘हिंमत शाळा’ नावाने विशेष वर्ग चालतात. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले जाते. आज, रविवारी मराठी शाळांतून शिकलेल्या यशवंतांची मुलाखत घेतली जाणार आहे. तसेच विविध क्षेत्रातील नामवंत मराठी शाळांबाबत पालक म्हणून आपली भूमिका मांडतील. ‘मराठी शाळांपुढील आव्हाने आणि नावीन्यपूर्ण उपाय’ याविषयावरही चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ७.३० यावेळेत सर्व कार्यक्रम होतील.

मराठी शाळांच्या प्रयोगशीलतेचे प्रदर्शन

महाराष्ट्र विद्यालयात सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत विविध मराठी शाळांच्या प्रयोगशील उपक्रमांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. पार्ले टिळक विद्यालयातर्फे टाकाऊ वस्तूंपासून मनोरंजक आणि एकाग्रता वाढवणारे खेळ तयार करण्यात आले आहेत. फलटणच्या प्रगत शिक्षण संस्थेने शब्द आणि चित्रांच्या माध्यमातून मुलांना धडा कसा शिकवावा याचे प्रदर्शन मांडले आहे. नाशिकच्या आनंद निकेतन शाळेत विद्यार्थ्यांना ‘चरित्र’ हा साहित्यप्रकार समजण्यासाठी शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेण्याची संधी दिली जाते. त्यावरुन मुले चरित्र लिहितात. तसेच मोजके शब्द देऊन त्यावरुन गोष्ट लिहिणे हा उपक्रम राबवला जातो. विद्यार्थी लिखित साहित्य प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. बेळगावच्या खानापूरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेने तयार केलेल्या रंगीत पुस्तकातील पाने पलटल्यावर अक्षर स्थिर राहाते आणि त्याभोवतीचे काना मात्रा बदलत राहतात. यातून मुलांना मजेशीर पद्धतीने बाराखडी शिकता येते. नंदादीप शाळेने चित्रांवरुन म्हणी ओळखणे हा उपक्रम राबवला आहे. तसेच एका अक्षरावरुन मुलांना किती शब्द सुचतात याची नोंद वेळोवेळी घेतली जाते. यातून विद्यार्थ्यांची शब्दसंपदा वाढीचा वेग लक्षात येतो. या सर्व प्रयोगांना विद्यार्थी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button