महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना रिंगरोड बाधितांचा बसणार फटका?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/LAXUMAN-JAGTAP.jpg)
- रिंगरोड बाधितांमध्ये अद्यापही प्रचंड रोष
- जगतापांपुढे निर्माण झाले मोठे संकट
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
रिंगरोड बाधितांचा आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावरील रोष काही कमी होताना दिसत नाही. रिंगरोड आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भोसरीत अडविल्यानंतर आता ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना सुध्दा या बाधितांनी भर सभेत खडेबोल सुनावले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपवाल्यांनी रिंगरोडवाल्यांचा चांगलाच धसका घेतला आहे. निवडणुकीत संतप्त रिंगरोड बाधितांचा महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना फटका बसणार असल्याचे चित्र दिसत आहे.
पिंपरी-चिंचवड शहराचे राजकारण रिंगरोड, अनधिकृत बांधकाम आणि शास्ती कराच्या मुद्याभोवताली फिरत आहे. त्यातील रिंगरोड हा कळीचा मुद्दा ठरला आहे. रिंगरोड हा चिंचवड विधानसभा मतदार संघात असल्यामुळे वाल्हेकरवाडी, थेरगाव, काळेवाडी, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, कासारवाडीचा काही भाग येथील हजारो नागरिकांच्या घरांवरून नांगर फिरवला जाणार आहे. राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात येथील नागरिकांची घरे पडू नयेत म्हणून तत्कालीन सरकारने रिंगरोडचा मुद्दा प्रलंबित ठेवला. तो मुद्दा पुन्हा हाती घेऊन भाजप सरकारने रिंगरोड बाधित नागरिकांना डिवचले. या रहिवाशांचा रोष आणि आक्रम रुप पाहून मुख्यमंत्र्यांना सुध्दा भोसरीतून वाहतुकीचे नियम मोडीत पलायन करावे लागले. रिंगरोड बाधितांच्या मनातील धगधगती आग आजुनही कायमच आहे.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी काल ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची थेरगाव येथील एका मंगलकार्यालयात सभा झाली. या सभेत रिंगरोड बाधित नागरिकांनी पंकजा मुंडे यांना भर सभेत उभा राहून रिंगरोड रद्द कधी करणार, असा प्रश्न केला. अनधिकृत बांधकामे नियमित कधी करणार, अशा प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. त्यावर पंकजा मुंडे यांनी लोकशाहिचा कळवळा असल्याचे दाखवत नागरिकांची भूमिका चुकीची असल्याचे म्हटले. स्वतःच्या हक्कासाठी लढणा-या नागरिकांना मुंडे यांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठरवले. शेवटी नागरिकांच्या न्याय, हक्काच्या लढाईत सुध्दा या नेत्यांना राजकारणच दिसते, हे पंकजा मुंडे यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले. त्याचा फटका मुंडे यांना बसणार नसून तो आमदार लक्ष्मण जगताप यांना बसणार आहे. याचे तरी मुंडे यांनी भान ठेवायला हवे होते. परंतु, त्यांनी तसे केले नाही.
यावेळी जगतापांचा करिष्मा चाणार का?
रिंगरोड रद्द होणार नाही, रोंगरोड बाधित नागरिकांचे पुनर्वसन केले जाईल. त्यांना आवास योजनेची घरे दिली जातील. असे आश्वासन आमदार लक्ष्मण जगताप यांनी सुध्दा नागरिकांना अनेकवेळा दिली आहेत. त्यामुळे जगतापांना नागरिकांचा रोष घ्यावा लागला. वाल्हेकरवाडीतील सभेत तर जगतापांना बोलण्यास अटकाव केला होता. हा असंतोष कमी होताना दिसत नाही. आता निवडणुकीत सुध्दा या बाधितांनी हा रोष कायम मनात ठेवल्याचे कालच्या मुंडेंच्या सभेतून दिसून आले. त्याचा जगतापांना फटका बसण्याची शक्यता आहे. असे असले तरी, सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना सुध्दा या भागातून मताधिक्य मिळाले आहे. जगतापांचा मतदार संघ असल्यामुळे त्यांनी इमाने इतबारे बारणे यांचे काम केले. त्यांच्यामुळेच बारणे यांना मताधिक्य मिळाले. एवढा रोष असतानाही जगतापांची ही जादू यावेळी फायदेशीर ठरणार का ?, असा प्रश्न आहे.