breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मराठा आंदोलकांवर सुडाची कारवाई

  • धनंजय मुंडे : सर्व गुन्हे तात्काळ मागे घ्या! 
  • मुंबई – मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर दगडफेक, जाळपोळ, खुनाच्या प्रयत्नांसारखे गंभीर गुन्हे दाखल करण्याची राज्य सरकारची कारवाई सूडाची आहे. या कारवाईचा निषेध करतानाच ही सुडाची कारवाई तात्काळ थांबवावी, मराठा आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यातील मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्याजिल्ह्यात लाखोंचे 58 मूक मोर्चे काढले. या मोर्चांनी शांतता, संयम आणि शिस्तीच्या संदर्भात जगात आदर्श निर्माण केला. जगात आदर्श निर्माण करणाऱ्या या मोर्चांसंदर्भात राज्य सरकारची भूमिका मात्र आकसाची राहिली आहे.

मूक मोर्चाची सरकारने गंभीर दखल न घेतल्यामुळे अखेर ठोक मोर्चाची घोषणा केली गेली. त्याकडेही गांभीर्याने पाहण्यात आलेले नाही. शेवटी आषाढी एकादशीला पंढरपूरच्या मंदिरात विठ्ठलपूजा करण्यापासून मुख्यमंत्र्यांना रोखण्याच्या निर्णय आंदोलकांनी घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील सहकारी मंत्र्यांनी यासंदर्भात केलेल्या वक्तव्यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले. त्यामुळे मराठा आंदोलन चिघळले हे वास्तव आहे, असे मुंडे म्हणाले.

मराठा आंदोलन चिघळण्यास सरकारची बेपर्वाई, बेजबाबदार, असंवेदनशील वृत्ती आणि सहकारी मंत्र्यांची चिथावणीखोर वक्तव्ये कारणीभूत असताना, त्यांच्यावर कारवाई होण्याऐवजी मराठा आंदोलकांवर दगडफेक, जाळपोळ, हिंसक कृत्ये, खुनाचा प्रयत्न असे गंभीर आरोप ठेवून त्यांना अटक करण्यात येत आहे. या कारवाईमुळे मराठा समाजातील तरुणांचे आयुष्य उद्‌वस्त होणार आहे. जे सरकार मराठा तरुणांचे आयुष्य घडविण्यास असमर्थ आहे, त्या सरकारला निरपराध तरुणांवर खोटे आरोप ठेवून गंभीर गुन्ह्यात गोवण्याचे अधिकार कुणी दिले?, असा सवालही त्यांनी केला.

पोलिसांकडून आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत. तसेच अन्य आंदोलकांविरुद्ध सुरु करण्यात आलेली देखील कार्यवाही तात्काळ थांबवण्यात यावी. यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्हा पोलीस प्रमुखांना तात्काळ निर्देश जारी करुन ही कारवाई थांबवण्यास सांगावे, अशी मागणी मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ देण्यासंदर्भात सरकारकडून उचलल्या जाणाऱ्या प्रत्येक कृतीस सहकार्य करण्याचा विश्वासही मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

अपयश लपविण्यासाठी कारवाई 
राज्यातील अनेक जिल्ह्यात मराठा आंदोलक युवकांवर गंभीर गुन्हे दाखल करण्याची कारवाई पोलिसांकडून सुरु आहे. या कारवाईमुळे मराठा समाजात सरकारविरुद्ध प्रचंड चीड, संताप आहे. या संतापाचा उद्रेक होऊन परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्‍यता आहे. मराठा आंदोलनाच्या पहिल्या आठ दिवसात निष्क्रिय राहिलेल्या सरकारने, आपले अपयश लपविण्यासाठी अशी सूडाची कारवाई करणे तात्काळ थांबवावे, अशी मागणी मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

राज्याच्या जिल्ह्याजिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत सर्वच लोकप्रतिनिधींचे एकमत आहे. अनेक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारीसुद्धा गुन्हे मागे घेण्याबाबत अनुकूल आहेत. परंतु जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आडमुठेपणामुळे मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button