मनसेकडून भाजपच्या खोट्या जाहिरातीची पुन्हा पोलखोल!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/mns-sandeep-deshpande.jpg)
मुंबई – ‘बोलव रे त्यांना’ करत मनसेकडून भाजपच्या खोट्या जाहिरातीची पुन्हा पोलखोल करण्यात आली आहे. कौशल्य इंडियाच्या माध्यमातून भाजप सरकारने रेखा वाहटूळे नावाच्या महिलेला भाजप योजनांचे लाभार्थी दर्शवणारी जाहिरात केली. मात्र आपण भाजप योजनांचे लाभार्थी नसल्याचा दावा करणारया या महिलेला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शनिवारी मनसेद्वारे राजगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलावले आणि भाजपच्या खोट्या जाहिरातीची चिरफाड केली.
यावेळी देशपांडे यांनी वाहटूळे यांची वृत्तपत्रात आलेली जाहिरात दाखवली. औरंगाबादमधील रेखा वाहटूळे या त्यांचा स्वत:चा मसाल्याचा व्यवसाय चालवतात. मला जेव्हा कौशल्य विकास योजनेबद्दल कळलं तेव्हा मी या योजने अंतर्गत प्रशिक्षण घेतले. या योजने अंतर्गत २० ते ३० टक्के सबसिडी मिळते, कर्ज उपलब्ध व्हायला मदत केली जाते असे सांगण्यात आले. तसेच व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही देण्यात आले. मात्र या योजनेचा आपल्याला कोणताच फायदा झाला नसल्याचे वाहटूळे यावेळी म्हणाल्या.
त्यानंतर माझ्याजवळ काही लोकं आली आणि त्यांनी जाहिरात केली. जाहिरातीत माझ्या व्यवसायाचा उल्लेख केला जाईल असे सांगण्यात आले, मात्र या जाहिरातीत अशा शासकीय योजनांची माहिती देण्यात आली ज्यांचा मला कोणताही लाभ झाला नाही. मी बँकेत १० लाखाचे कर्ज घ्यायला गेले, तर बँक तारण मागत आहे. तीन वर्षांचा आयटी रिटर्न मागते. त्यामुळे मला कोणतही लोन मिळालं नाही. मला सरकारने कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण दिलं पण कोणताच इतर लाभ मला मिळालेला नाही, अशी खंत त्यांनी पुढे व्यक्त केली.