breaking-newsपुणेमहाराष्ट्र

मतमोजणीसाठी पाच हजार कर्मचारी

पुणे : पुणे जिल्ह्य़ातील पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर अशा चार लोकसभा मतदारसंघांच्या मतमोजणीसाठी तब्बल पाच हजार अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.

पुणे, बारामती मतदारसंघांचे कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य गोदाम, तर मावळ आणि शिरूरची मतमोजणी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे पार पडली. या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी अडीच हजार कर्मचारी मतमोजणीसाठी प्रशासनाकडून नियुक्त करण्यात आले होते.

मतमोजणीसाठी सकाळी सहा वाजता निवडणूक कर्मचारी दाखल झाले. सात वाजता निवडणुकीला उभ्या असलेल्या उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर मतदान यंत्रे ठेवलेली स्ट्राँग रूम उघडण्यात आली. त्यानंतर कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून सकाळी बरोबर आठ वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात आली.

कोरेगाव पार्क येथे जिल्हाधिकारी तथा पुणे मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी नवल किशोर राम, बारामतीचे निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष डुंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, काँग्रेसचे पुण्याचे उमेदवार मोहन जोशी या वेळी उपस्थित होते.

तर, बालेवाडी येथे शिरूरचे निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे आणि मावळच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांच्यासह पर्यवेक्षक, सूक्ष्म निरीक्षक या वेळी उपस्थित होते. याबरोबरच पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, ग्रामीण पोलिस प्रशासनाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) यांच्या तुकडय़ा तैनात करण्यात आल्या होत्या.

निवडणूक कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यात आले होते. मतमोजणीसाठी एका टेबलवर सहायक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि सूक्ष्म निरीक्षक उपस्थित होते.

मतमोजणीच्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी, केंद्रीय निवडणूक निरीक्षक, सहायक निवडणूक अधिकारी वगळता अन्य कर्मचाऱ्यांना मोबाइल, कॅमेरा वापरण्यास बंदी होती. याशिवाय इंटरनेट, वायफाय वापरण्यासही मज्जाव करण्यात आला होता.

पुणे मतदारसंघात मतमोजणीच्या २१ फेऱ्या

पुणे लोकसभा मतदारसंघात एक हजार ९९७ मतदान केंद्रे होती. मतमोजणी टेबल ९६ होती. मतमोजणीच्या २१ फेऱ्या झाल्या. बारामतीमध्ये दोन हजार ३७२ मतदान केंद्रे होती. मतमोजणीसाठी १०६ टेबल होती आणि मतमोजणीच्या २४ फेऱ्या झाल्या. मावळमध्ये दोन हजार ५०४ मतदान केंद्रे आणि मतमोजणीसाठी शंभर टेबल होती. मतमोजणीच्या २५ फेऱ्या झाल्या. शिरूरमध्ये दोन हजार २९६ मतदान केंद्रे होती. मतमोजणीसाठी ८४ टेबल होती आणि मतमोजणीच्या २७ फेऱ्या झाल्या.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button