‘भारत बंद’ हा कोणताही राजकीय बंद नाही – संजय राऊत
![Chief Minister, Deputy Chief Minister angry over Nana Patole's resignation; Confirmation of Sanjay Raut](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Sanjay-Raut-1200.jpg)
मुंबई – केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन कृषी कायद्याविरोधात निषेध करत आंदोलन करणार्या शेतकऱ्यांनी ८ डिसेंबरला भारत बंदची घोषणा केली आहे. या भारत बंदला महाविकासआघाडी सरकारने पाठिंबा दिला आहे. आमचे तीन पक्ष इथे एकत्र आहेत. तिन्ही पक्षांनी पाठींबा दिल्याचे जाहीर केला आहे. हा बंद फार वेगळा आहे, अशी माहिती शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
“महाविकासाघाडीतील तिन्ही पक्षांनी पाठिंबा दिला आहे. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबाबतची भूमिका घेतली होती. हा कोणताही राजकीय बंद नाही. एखाद्या राजकीय पक्षाच्या मागण्या बंद करण्यासाठी नाही. तर शेतकऱ्यांचा आवाज बुलंद होण्यासाठी हा बंद पाळावा,” असं आवाहनही संजय राऊतांनी केले आहे.
“शेतकरी हा संकटातही शेतात राबतो. आपण लॉकडाऊनमध्ये घरी बसलेले असताना त्याने आपल्याला साथ दिली. आज त्याला आपली गरज असेल, तर त्याला साथ द्यावी,” असेही राऊत म्हणाले. “गेल्या १०-१२ दिवसांपासून शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. थंडीत आंदोलनाला बसला आहे. २०१० ची परिस्थिती वेगळी होती. आजची वेगळी आहे. कोणाच्या मनात शंका असेल तर त्यांना विचारा. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कृषी क्षेत्रातील तज्ञ समजले जातात,” असेही राऊतांनी सांगितले आहे
“कोणताही नेता शेतकऱ्यांच्या भावनेशी प्रतारणा करणार नाही. हा विषय देशव्यापी झाला आहे. सरकारनं दिल्लीत गेल्या १२ दिवसांपासून दडपशाही सुरु केली आहे. म्हणून स्वेच्छेन या बंदमध्ये सहभागी व्हावं,” असे आवाहन संजय राऊतांनी जनतेला केलं आहे. त्यामुळे उद्याच्या भारत बंदमुळे केंद्र सरकारची भूमिका बदलणार का बैठकीत काय तो़डगा निघणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.