भाजप-शिवसेना युती सरकारची कृपादृष्टी ; संभाजी भिडे यांच्यावरील दंगलीचे गुन्हे मागे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/Sambhaji-Bhide.jpg)
मुंबई – संभाजी भिडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले दंगलीचे गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांनी हा दावा केला आहे. 2008 साली प्रदर्शित झालेल्या जोधा अकबर चित्रपटाला विरोध करताना संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांनी मालमत्तेची मोडतोड करण्यात आली होती. त्या प्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर हे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, संभाजी भिडे यांच्यासोबतच शिवसेना आणि भाजपाचे कार्यकर्ते तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याही काही नेत्यांवरील गुन्हे मागे घेण्यात आले. या संदर्भात माहिती मिळवण्यासाठी आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी २००८ पासून किती जणांवरील गुन्हे मागे घेण्यात आले त्याची माहिती मागितली होती. त्यातून जून २०१७ मध्ये संभाजी भिडे आणि त्यांच्या तीन साथीदारांवरील गुन्हे मागे घेतल्याची माहिती समोर आली. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार सत्तेवर असताना २००८ ते २०१४ दरम्यान एकही गुन्हा मागे घेतला नाही. मात्र जून २०१७ ते १४ सप्टेंबर २०१८ पर्यंत शेकडो आरोपींवरचे गुन्हे मागे घेण्यात आले. शकील अहमद यांनी आरटीआय दाखल केलेली त्यातून ही माहिती समोर आली आहे.