भाजपा सरकारला सत्तेचा माज आलाय – राज ठाकरे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/Raj-1.jpg)
भारतीय जनता पार्टीच्या सरकारला माज आला आहे, हा माज उतरायलाच हवा असे उद्गार मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काढले आहेत. अवनी किंवा टी-1 या वाघिणीच्या हत्येवरून राज्य सरकारवर टिकेचा ओघ सुरू असताना राज ठाकरे यांनीही वाघिणीला बेशुद्ध करायला हवं होतं, संवर्धन करायला हवं होतं अशी भूमिका घेतली आहे.
प्रसारमाध्यमाशी बोलताना राज म्हणाले की, वनमंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार हे काही वनतज्ज्ञ नव्हेत; ते आज मंत्री आहेत, उद्या मंत्रिपद जाऊ शकतं. परंतु ज्यापद्धतीनं ते उत्तरं देत आहेत ते अयोग्य असल्याचं ठाकरे म्हणाले. मला 50 पैशात फोन केला असतात तर वस्तुस्थिती कळली असती हे काय वनमंत्र्यांचं उत्तर झालं का असं विचारत भाजपा सरकारला माज आल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
पुतळे उभे करून वाघांचं संवर्धन होत नाही असं सांगत त्यासाठी सरकारनं विशेष प्रयत्न करायला लागतात असं ठाकरे म्हणाले. बोरीवलीच्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये जगामधले एकाच ठिकाणी आढळणारी सर्वाधिक बिबट्यांची संख्या असल्याचा दाखला देत ठाकरे यांनी या पार्कच्या चारही बाजुंनी होणाऱ्या अतिक्रमणांचा उल्लेख केला. तसेच, बिबटे व माणसांचा संघर्ष होण्याची शक्यता वर्तवत सरकारनं वेळीच काळजी घ्यायला हवी असे सांगितले.
त्याचवेळी अनिल अंबानींच्या कंपनीसाठी वाघिणीला मारल्याच्या बातम्यांचा संदर्भ देत राज ठाकरे म्हणाले की अशा धेंडांच्या मागे सरकार का उभे राहते तेच कळत नाही. अर्थात, निवडणुका फार दूर नसून लोकांनीच भाजपाचा माज उतरवावा असे आवाहनही राज यांनी केले आहे.