भाजपावर माधुरीची ‘मोहिनी’, पुण्यातून लोकसभेचं तिकीट देणार ?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/madhuri-759.jpg)
बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित राजकारणात प्रवेश करणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. इतकंच नाही तर आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा पुण्यातून माधुरीला उमेदवारी देण्यात येणार असल्याचंही बोललं जात आहे. माधुरी दीक्षित निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या बातमीमुळे पुण्यात आणि विरोधकांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.
याआधी शरद पवार पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरु होती. मात्र शरद पवारांनीच या चर्चांना पूर्णविराम दिला होता. मात्र आता पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपा माधुरी दीक्षितला तिकीट देणार असल्याचं बोललं जात आहे. महत्त्वाचं म्हणजे, भाजपा 2019 लोकसभा निवडणुकीत सेलिब्रेटींनी उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी भाजपाकडून देशव्यापी सर्वेक्षणही करण्यात आलं होतं.
काही महिन्यांपूर्वी भाजपाध्यक्ष अमित शाह भाजपा संपर्क अभियानासाठी मुंबई दौऱ्यावर आले होते, त्यावेळी त्यांनी माधुरी दीक्षितची तिच्या घऱी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी माधुरीला राज्यसभेची ऑफर देण्यात आल्याची चर्चा चांगलीच रंगली होती.
दरम्यान माधुरीला ज्या मतदारसंघातून उमेदवारी देण्याबद्दल बोललं जात आहे त्या जागेचं प्रतिनिधित्व भाजपा खासदार अनिल शिरोळे करत आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर गदा येणार का असा प्रश्न उपस्थित होतो. राज्यसभेतील भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी मात्र हे वृत्त फेटाळून लावलं आहे. पण अद्याप माधुरी दीक्षितकडून यासंबंधी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.