‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त
बा. सी. मर्ढेकर स्मारक समितीची टीका
पुणे : महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्यावरील ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटात युगप्रवर्तक कवी बा. सी. मर्ढेकर यांचे चित्रणही विपर्यस्तच असल्याची टीका, कवी बा. सी. मर्ढेकर स्मारक समितीतर्फे करण्यात आली आहे.
किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका हिराबाई बडोदेकर आणि स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी या कलाकारांबरोबरच मर्ढेकर यांचे चित्रणही विपर्यस्त ठरल्यामुळे ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘रूक्ष प्राध्यापक’ असा उल्लेख चित्रपटात करून मर्ढेकर यांचा अवमान केला असल्याचा दावा समितीचे श्रीनिवास वारुंजीकर यांनी केला आहे.
वास्तविक मर्ढेकरांच्या ‘शिशिरागम’ या पहिल्याच कवितासंग्रहातील बहुतांश कविता रोमँटिक आहेत. मर्ढेकरांच्या एका कवितेला पुलं चाल लावण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा प्रसंग चित्रपटात घेतला आहे. पुलं आणि सुनीताबाई यांनी अभिवाचन करून मर्ढेकर यांच्या कविता जनसामान्यांपर्यंत पोहोचविल्या. मात्र, पुलंनी त्यांच्या कवितेला चाल लावण्याचा प्रयत्न केल्याचा संदर्भ कुठेही मिळत नाही, याकडे वारुंजीकर यांनी लक्ष वेधले.