breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

भांडुपमध्ये भेसळयुक्त दूध जप्त

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; १२४ लिटर दुधाचा साठा

भांडुपच्या तुळशेतपाडय़ातील दूध भेसळीचे रॅकेट अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी पहाटे उघडकीस आणले. दुधाच्या पिशव्या कापून त्यामध्ये पाणी मिसळणाऱ्या दोघांना प्रशासनाने पकडले असून १२४ लिटर दुधाचा साठा जप्त केला आहे.

तुळशेतपाडा आणि सोनापूर या झोपडपट्टीमध्ये दूध भेसळ होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी पहाटे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या भागात छापे घातले. तुळशेतपाडय़ातील वस्त्यांमधील घरांमध्ये दुधामध्ये पाणी भेसळ करताना गंगाधर आणि वज्जा हे दोघे जण सापडले. दुधाची पिशवी एका कोपऱ्यातून कात्रीने कापून त्यातील एक ते दीड ग्लास दूध काढून त्याऐवजी पाणी दुधामध्ये मिसळतात. पुन्हा ही पिशवी सफाईदारपणे मेणबत्तीवर जोडून विक्रीस पाठविले जात असल्याचे तपासणीत आढळले. यामध्ये पाश्चराइज्ड टोन्ड मिल्कसह अमूल ताजा, मदर डेअरी, महानंद या ब्रॅण्डच्या दुधामध्ये भेसळ केली जात होती. या पिशव्यांमधील दुधाचे नमुने चाचणीसाठी प्रशासनाने घेतले आहेत. या तपासणीत साडेपाच हजार रुपयांच्या आणि १२४ लिटरच्या भेसळयुक्त दुधाचा साठा प्रशासनाने जप्त केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त शैलेश आढाव यांनी दिली. दोघांवरही भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अटक केली आहे. दूध किंवा अन्न पदार्थात भेसळ करणाऱ्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करून अशा आजन्म कारावासाची शिक्षा देण्याची कायदेशीर सुधारणा नुकतीच केली आहे.

भेसळयुक्त, निकृष्ट दुधात ८ टक्क्यांनी वाढ

राज्यात विक्री होणाऱ्या भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या दुधात आठ टक्क्यांनी वाढ झाली असून ७८ टक्के दूध हे निकृष्ट आणि भेसळयुक्त असल्याचे कन्झ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेने अहवालातून मांडले आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणेसह इतर जिल्ह्य़ांतून ६९० दुधाचे नमुन्यांची तपासणी केली. यामध्ये नामांकित (ब्रॅण्डेड) आणि बिगर नामांकित खुल्या दुधाच्या (नॉन ब्रॅण्डेड) नमुन्यांचाही समावेश आहे. त्यापैकी २२८ नामांकित दुधाच्या नमुन्यांतील १८१ नमुने हे भेसळयुक्त ठरले. ४६२ बिगरनामांकित म्हणजे खुल्या दुधातील ३५८ नमुने भेसळयुक्त ठरले.

काळजी अशी घ्यावी

ग्राहकांनी सतर्कतेने दूध पिशवीचे निरीक्षण केल्यास अशा प्रकारची भेसळ झाल्याचे निदान करणे शक्य आहे. मशीनमधून बंद केल्या जाणाऱ्या पिशव्यांचे चारही कोपरे टोकदार असतात. जेव्हा यातले टोक कापून पुन्हा जोडले जाते, तेव्हा ते टोकदार दिसत नाही. तेव्हा वरचेवर दुधाच्या पिशव्यांची बारकाईने पाहणी करावी, असे आवाहन आढाव यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button