breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बेकायदा गर्भपात प्रकरण ; महाडिक हॉस्पिटलचा परवाना रद्द

सांगली – सांगली येथील बेकायदा गर्भपात प्रकरणात सहभागाची शक्यता असल्याच्या कारणावरून रविवारी अटक करण्यात आलेल्या डॉ. अविजित पोपटराव महाडिक याच्या विटा येथील महाडिक हॉस्पिटलचा वैद्यकीय परवाना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. बी. साळुंखे यांनी रद्द केला. शुक्रवारी डॉ. साळुंखे यांच्या आदेशानुसार विटा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश लोखंडे व विटा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी संयुक्तरित्या महाडिक हॉस्पिटलचा परवाना रद्द केल्याने रुग्णालय पूर्णपणे बंद ठेवण्याची सूचना लेखी पत्राद्वारे केली.

सांगली येथे बेकायदा गर्भपातप्रकरणी डॉ. चौगुले दाम्पत्यास पोलिसांनी गजाआड केल्यानंतर विटा येथील डॉ. अविजित महाडिक याचे नाव तपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांच्यासह पोलीस पथकाने शनिवारी रात्री उशिरा विटा येथील महाडिक हॉस्पिटलवर छापा टाकला होता. त्यावेळी पोलिसांनी आक्षेपार्ह कागदपत्रे ताब्यात घेतली होती. रविवारी डॉ. अविजित महाडिक यास अटक केली.

या प्रकरणात डॉ. महाडिक यास अटक केल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साळुंखे यांनी विटा येथील महाडिक हॉस्पिटलला १९४९ च्या बॉम्बे नर्सिंग होम अ‍ॅक्टच्या कलम ५ अन्वये देण्यात आलेला नोंदणी क्र. व्ही-४७९ हा वैद्यकीय परवाना रद्द केला. त्याबाबतचा आदेश ग्रामीण रूग्णालय व विटा नगरपरिषदेला पाठवून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार ग्रामीण रूग्णालय व नगरपरिषदेने शुक्रवारी दिलेल्या संयुक्त पत्राद्वारे डॉ. महाडिक यास रुग्णालयाचा मूळ परवाना वैद्यकीय अधीक्षकांकडे जमा करून, पुढील आदेश होईपर्यंत रुग्णालय बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button