बलात्कारांचे व्हिडिओ पॉर्न साईटवर टाकणाऱ्या कंटक्टरला बेड्या
![20 years hard labor for torturing a minor girl](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Arrest.jpg)
पालघर – महिलांवर बलात्कार होत असल्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करून ते पॉर्न साईटवर टाकणाऱ्या एका कंडक्टरला पालघर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे संबंधित आरोपीने मास्टर्स विषयातील पदवी घेतली असून तो डिसेंबरपासून असे कृत्य करत होता.
आरोपीने आतापर्यंत वेगवेगळया महिलांसोबतच्या त्याच्या ६५ क्लिप्स परदेशी पॉर्न वेबसाइटसवर अपलोड केल्या आहेत. त्यातून तो लाखो रुपये कमवायचा असे पोलिसांनी सांगितले. आतापर्यंत दोन पीडित महिला समोर आल्या असून आरोपीविरोधात बलात्काराचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात पैसे कमावण्यासाठी त्याने अशाच पद्धतीने अन्य महिलांचे सुद्धा शोषण केले, असे पोलिसांनी सांगितले. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.
एका पीडित महिलेच्या नातेवाईकाने पॉर्न साइटवर तिचा आरोपीसोबत व्हिडीओ पाहिल्यानंतर त्या व्यक्तीने पीडित महिलेच्या कुटुंबाला याची कल्पना दिली. त्यानंतर हा प्रकार समोर आला. कुटुंबियांनी जाब विचारल्यानंतर पीडित महिलेने तिच्याबरोबर काय घडलं? ते सर्व सांगितलं. आरोपीने तिच्याबरोबर मैत्री केली व महापालिकेत नोकरी लावतो असे आश्वासन दिले. काही दिवसांनी आरोपी तिला एका ठिकाणी घेऊन गेला. तिच्यावर बलात्कार केला व त्याचे व्हिडीओ चित्रीकरण केले. व्हिडीओ अपलोड केल्यानंतर याबद्दल कोणाला सांगितले, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी आरोपीने धमकी दिल्याचे मुलीने कुटुंबीयांना सांगितले.
त्यानंतर कुटुंबीयांच्या मदतीने पीडिती मुलीने आरोपी विरोधात विक्रमगड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. दरम्यान दुसऱ्या एका पीडित महिलेने सुद्धा वाळीव पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार नोंदवली. आरोपीविरोधात बलात्काराच्या दोन वेगवेगळया एफआयआर नोंदवण्यात आल्या आहेत. आपल्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आल्याचे समजल्यानंतर आरोपीने घरातून पळ काढला. तो पत्नीला भेटायला येणार असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी त्याला तिथून ताब्यात घेतले.