फोनवर बोलत वाहन चालवणाऱ्या 96 पीएमपी चालकांना दंड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/PMPML-.jpg)
- प्रत्येकी एक हजारांचा दंड ः नागरिकांना बक्षीसम्हणून तिच रक्कम
पुणे – मोबाईल फोनवर बोलत गाडी चालवल्याने अपघात होण्याची दाट शक्यता असते. अशा अपघातांमुळे अनेकदा निष्पाप नागरिकांचे बळी देखील जातात. या पार्श्वभूमिवर फोनवर बोलत पीएमपी बस चालविणाऱ्या चालकावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार प्रशासनाकडून फोनवर बोलत वाहन चालवणाऱ्या 96 पीएमपी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून प्रत्येकी 1 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे.
वाहतुकीच्या नियमानुसार वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे धोकादायक आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यापार्श्वभुमीवर पीएमपीने अशा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी प्रशासनाकडून नागरिकांना अशा चालकांचे फोटो पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते. चालक मोबाईलवर बोलताना आढळल्यास प्रवाशांनी त्यांचे फोटो काढून महामंडळाकडे जमा करावे. यानंतर याची सविस्तर तपासणी करून चालक दोषी आढळल्यास त्याच्याकडून 1 हजाराचा दंड वसूल करण्यात येतो. संबंधित रक्कम माहिती पाठवणाऱ्या प्रवाशास बक्षीस म्हणून देण्यात येते.
…………………….
दंडाची रक्कम वाढवून केली दोन हजार
जानेवारी 2014 ते फेब्रुवारी 2018 दरम्यानच्या कालखंडात शहरातील विविध रस्त्यांवरून बस चालविणारे बसचालक मोबाईलवर बोलत असल्याचे फोटो पीएमपीएमएल प्रशासनाकडे दाखल करण्यात आले होते. त्यानुसार प्रशासनाने संबंधित चालकाची ड्युटी, बस क्रमांक, फोटो तारीख, तिकीट अनुक्रमांक, वाहकाचा क्रमांक इत्यादीची तपासणी करून चालकांना प्रत्येकी 1 हजाराचा दंड वसूल केला आहे. दंडाची रक्कम फोटो काढणाऱ्या प्रवाशाला बक्षिस म्हणून देण्यात आली आहे. बस चालविताना मोबाईलवर बोलल्यास मार्च 2018 पासून दंडाची रक्कम वाढवून दोन हजार रुपये करण्यात आली होती. त्यानुसार मार्चमध्ये एका चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.