breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

फसवणुकीचा फोन चुकून गेला पोलीस आयुक्तांना, १९ वर्षांचा तरुण गजाआड

मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १९ वर्षांच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. आशिषकुमार झा असे या तरुणाचे नाव असून तो झारखंडचा रहिवासी आहे. दोन वर्षांपूर्वी आशिषकुमारने संजय बर्वे यांना फोन करुन त्यांच्या बँक खात्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सायबर फसवणुकीविषयी माहिती असल्याने संजय बर्वे यांनी त्याला माहिती देणे टाळले आणि या प्रकरणी थेट पोलिसांकडे तक्रार दिली.

दोन वर्षांपूर्वी संजय बर्वे हे राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात प्रमुखपदी कार्यरत होते. ११ जुलै २०१७ रोजी संजय बर्वे यांना एक फोन आला. फोनवरील व्यक्तीने स्वत:ची ओळख स्टेट बँक ऑफ इंडियाचा अधिकारी अशी करुन दिली. तुमचे क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्यात आले असून कार्ड अनब्लॉक करण्यासाठी कार्डवरील १६ आकडी नंबर, पिन नंबर आणि सीव्हीव्ही आदी तपशील लागेल, असे त्या व्यक्तीने संजय बर्वे यांना सांगितले. ऑनलाइन फसवणुकीविषयी माहिती असल्याने संजय बर्वे यांनी तपशील देणे टाळले. तसेच या प्रकरणी सायबर शाखेकडे तक्रारही केली. फसवणुकीचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

अखेर शुक्रवारी पोलिसांनी झारखंडमधून १९ वर्षांच्या तरुणाला अटक केली. आशिषकुमार असे या तरुणाचे नाव असून तो ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीचा सदस्य असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आशिषकुमारकडील मोबाईलच्या ‘आयएमइआय’नंबरच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आशिषकुमारच्या वकिलांनी मात्र पोलिसांचा दावा फेटाळून लावला आहे. आशिषकुमारने सेकंड हँड मोबाईल खरेदी केला होता, ऑनलाइन फसवणूक करणारी टोळी मोबाईल फोनचा वापर केल्यानंतर तो फोन बाजारात विकत असतील, असा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button