फलकबाजीबाबत न्यायालयाची नोटीस
भाजप, राष्ट्रवादी, मनसे, ‘आरपीआय’चा समावेश
बेकायदा फलकबाजी करणार नाही, असे हमीपत्र देऊनही सर्रास बेकायदा फलक लावल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने शुक्रवारी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आरपीआय (आठवले) या राजकीय पक्षांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली. हमी देऊनही बेकायदा फलकबाजी का केली आणि ती करणाऱ्या नेते-कार्यकर्त्यांवर कारवाई का केली नाही? याबाबत खुलासा करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
बेकायदा फलक लावून शहरे बकाल करणाऱ्या राजकीय पक्षांवर कारवाई करू शकत नसल्याची हतबलता केंद्रीय निवडणूक आयोगाने व्यक्त केली होती. त्यानंतर हमीपत्र देऊनही त्याविरोधात वर्तन करणारे पक्ष आणि त्यांचे नेते-कार्यकर्ते यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशाराही न्यायालयाने दिला होता. त्याकरिता कोणत्या राजकीय पक्षाने, त्यांच्या नेते वा कार्यकर्त्यांनी कुठे व किती बेकायदा फलकबाजी केली याची यादी सादर करण्याचे आदेश न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिले होते.