फडणविसांवर शिवसेना नेत्या कडाडल्या, म्हणाल्या ‘लव्ह जिहाद हा भाजपचाच अजेंडा’
![To whom was the contract awarded? The question of netizens; ‘To your father’, the mayor replied](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/kishori-pednekar.jpg)
मुंबई – राज्यात ‘लव्ह जिहाद’च्या मुद्द्यावरून राजकारण तापलं असताना आता शिवसेना नेत्या आणि मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यात उडी घेतली आहे. ‘लव्ह जिहाद’ हा केवळ भाजपचा अजेंडा आहे. भाजप या मुद्द्यावरून केवळ शब्दांचा खेळ करत आहे. अशी टीका महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली.
लव्ह जिहाद कुठे झाला आहे हे आम्ही दाखवून देऊ. पण लग्न हा मुलगा-मुलीच्या पसंतीचा विषय आहे. मात्र, भाजप यावरून केवळ राजकारण करत आहे, असंही किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी शनिवारी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. आपल्या वक्तव्याबाबत त्या म्हणाल्या, मी केवळ धार्मिक स्थळं म्हटलं नाही, तर बियर बारमध्ये जाणाऱ्यांमुळेही मुंबईत कोरोना पसरला. मात्र, आपल्या वक्तव्याचा भाजपकडून विपर्यास करण्यात आला. कोरोनाबाबत लोक गंभीर नाहीत. मुंबईत दोन टक्के लोकांनी यावरुन राजकारण करण्याचा घाट घातल्याची टीका किशोरी पेडणेकर यांनी केली. बक्कळ, रग्गड अशी भाजपची भूमिका चुकीची आहे.
महापालिका निवडणुकीत आम्ही त्यांना (भाजपला) आमची ताकद काय आहे ते दाखवून देऊ, असं आव्हानही किशोरी पेडणेकर यांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संयमी नेतृत्त्वामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याचा दावा पेडणेकर यांनी केला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 15 दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द कराव्यात, अशी मागणीही किशोरी पेडणेकर यांनी यावेळी केली.