प्रकाश आंबेडकरांच्या सभेत तरुणाचा पेटवून घेण्याच्या प्रयत्न
कोल्हापूर – वंचित बहुजन आघाडीतर्फे येथील शिवाजी स्टेडियम मैदानावर मंगळवारी सत्ता संपादन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यातच एका तरुणाने अचानक जयघोष करत अंगावर रॉकेल ओतून घेत स्वत:ला पेटविण्याचा प्रयत्न केला. मैदानात मोठ्या संख्येने उपस्थित असणार्या पोलिसांच्या हे लक्षात येताच त्यांनी तातडीने त्या तरुणाकडे असणारा रॉकेलचा कॅन काढून घेतला.
सभेत व्यत्यय आणणार्या या तरुणाला उपस्थितांनी चांगलाच चोप दिला. पोलिसांनी नागरिकांच्या तावडीतून त्याची सुटका करून त्याला मैदानाबाहेर काढले. यामुळे सभेत एकच गोंधळ उडाला होता. वातावरण चांगलेच तंग झाले होते. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थितांना शांतता राखण्याचे आवाहन करून सभा पूर्ववत सुरू केली. दरम्यान, पेटवून घेणारा हा तरुण दुसरा-तिसरा कोणी नसून भरत मोरे हा विक्षिप्त तरुण असल्याचे सर्वांच्या लक्षात आले. यापूर्वीही त्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेत असा प्रकार केला आहे. या तरुणाला जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.