पोटनिवडणुकांचा निकाल ही २०१९ मधील विजयाची सुरुवात- शिवसेना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/uddhav-thackeray-1.jpg)
मुंबई : पालघरमध्ये शिवसेना विरुद्ध भंगार इव्हीएम अशी लढत झाली. त्यामुळे विजयी मिरवणूक काढायची असेल तर ती निवडणूक आयोग, पोलीस यंत्रणा आणि इव्हीएमची काढायला हवी, असे सांगत शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय झाला असून या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर टीका करण्यात आली.
पालघरमधील ‘इव्हीएम’ने मिळवून दिलेला विजय सोडला तर भाजपाच्या हाती देशभरात धुपाटणेच लागले. हे निकाल म्हणजे २०१९ च्या मोठ्या विजयाची सुरुवात असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. देशभरातील लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपाचा पाडाव झाला असून पालघरचा विजय हा निवडणूक आयोगाशी ‘युती’ करून घोषित करण्यात आला, असा आरोप शिवसेनेने केला आहे. भाजपाने काँग्रेसचे भ्रष्ट राजेंद्र गावीत यांना कमळ पाकळ्यांचे दुग्धस्नान घालून हळद लावून घोड्यावर बसवले. तरीही घोडा पुढे पाऊल टाकीना. तेव्हा नवरदेवाच्या वरातीतील बॅण्डबाजा पथक व नाच्यांनी संपूर्ण पालघरात पैशांचा धो धो पाऊस पाडला.
पैशाने भागले नाही तेव्हा आदिवासी पाड्यांवर दारूवाटप केले. हा इतका सरंजाम व थाटमाट करूनही भाजपाने भाड्याने घेतलेला काँग्रेसचा घोडा जागचा हलायला तयार नव्हताच. तेव्हा निवडणूक आयोग, पोलीस यंत्रणेस वरातीत उतरवले व शेवटी ‘ईव्हीएम’ची भंगार यंत्रणा हाताशी धरून हा विजय मिळवण्यात आला, असा दावा शिवसेनेने केला आहे.