‘पोंक्षे डोक्यावर पडला काय ?’, ‘काय बोलतो त्याचे त्याला तरी कळते का ?’ – जितेंद्र आव्हाड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/119pxlogo.png)
मुंबई | महाईन्यूज
देशात ‘अस्पृश्यता निवारणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापेक्षा वीर सावरकरांचं योगदान श्रेष्ठ असल्याचं वक्तव्य अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलं होतं. त्यावर मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पोंक्षे यांच्यावर जोरदार टिका केली आहे. हा डोक्यावर पडला काय ? हा काय बोलतोय त्याचे त्यालाच कळते की नाही, माहित नाही, अशी खरमरीत टिका आव्हाड यांनी केली आहे.
कट्टर सावरकरवादी असलेल्या पोंक्षे यांच्या वक्तव्यामुळे याआधीही अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. फर्ग्युसन कॉलेजमध्ये आयोजित ‘मी सावरकर’ या वक्तृत्व स्पर्धेवेळी वाद झाला होता. या स्पर्धेच्या समारोपाला आलेल्या अभिनेते शरद पोंक्षे यांना पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या विरोधाचा सामना करावा लागला. त्यामुळे विद्यार्थी संघटनांच्या रोषाला बळी पडावं लागू नये म्हणून शरद पोंक्षे हे गुपचूप दुसऱ्या मार्गाने सभागृहात पोहोचले होते.
शरद पोंक्षे हे ‘मी सावरकर’ या वक्तृत्व स्पर्धेच्या समारोपासाठी फर्ग्युसन कॉलेजमध्ये येणार हे कळताच पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी विरोध सुरू केला. त्यावर पोंक्षे यांनी ही आक्षेपार्ह विधान केल्यामुळे आव्हाड यांनी त्यांना टार्गेट केलं आहे.
पुण्यातील या कार्यक्रमापूर्वी पुरोगामी विद्यार्थी संघटनांनी पोंक्षे येणार म्हटल्यावर आंदोलन केले. गांधीजींचा खून करणाऱ्या गोडसेचं समर्थन करणाऱ्या शरद पोक्षेंचा जाहीर निषेध, असे पोस्टर यावेळी विद्यार्थ्यांनी झळकावले होते. त्यामुळे कॉलेज परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला आणि पोलीस बंदोबस्तात कार्यक्रम सुरु करण्यात आला होता. आता या कार्यक्रमात त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.