पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे – नारायण राणे
![Action will be taken against Union Minister Narayan Rane's Neelratna bungalow](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/narayan-rane01.jpg)
सिंधुदुर्ग – विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोप तर होते असतातच. अशातच भाजपचे नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे, असा घणाघाती आरोप नारायण राणे यांनी केला. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या नाणार प्रकल्पावरून शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेवरही टीका केली आहे. तसेच शिवसेना दुटप्पी असल्याचा टोला लगावला आहे. ते विजयदुर्ग किल्ल्याची पाहणी करण्यासाठी आले असताना माध्यमांशी बोलत होते.
“दोन दिवसांपूर्वी नाणारमधील काही लोकांनी नाणार प्रकल्पाला समर्थन दिलं. त्यात ८० टक्के शिवसैनिक होते. पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे. बोलण्यात काय बदल करतील हे सांगू शकत नाही. पूर्वी विरोध केला आणि आता समर्थन करत आहेत. हे शिवसेनेचे घुमजाव आहेत. ही स्थानिक जनतेची फसवणूक आहे.” असा टोला नारायण राणे यांनी लगावला.
राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी विजयदुर्ग किल्ल्याची पाहणी केली होती. चार दिवसांपूर्वी या किल्ल्याची तटबंदी अतिवृष्टीमुळे कोसळली होती. या पाहणी दौऱ्यात राणेंसोबत त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे, माजी आमदार अजित गोगटे हेही सोबत होते. पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना राणे म्हणाले की, “विजयदुर्ग किल्ल्याची पडझड झाली असून आपण आता पाहणी केली आहे. संबंधित मंत्र्यांशी बोलून या किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करणार आहे. अधिवेशनात ही मागणी करणार असल्याचे यावेळी राणे म्हणाले.